आनंदाची बातमी : जामखेड शहराचा पाणीप्रश्न मिटला, भुतवडा तलाव ओव्हर फ्लो,

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । जामखेड शहराला पाणी पुरवठा करणारे भूतवडा जुना व नवा असे दोन्ही तलाव ओव्हर फ्लो झाले आहेत, अशी माहिती जामखेड लघु पाटबंधारे उपविभाचे उपविभागीय अभियंता उमेश कंगणकर व शाखा अभियंता रामभाऊ ढेपे यांनी दिली.

Good news,Jamkhed city's water problem solved, Bhutavada lake overflowed,

सुमारे 40 हजार लोकसंख्या असलेल्या जामखेड शहरासाठी भूतवडा तलावातून पाणी पुरवठा होतो. या भागात भूतवडा जुना आणि भूतवडा नवीन असे दोन तलाव आहेत. जून्या तलावाची पाणी साठवण क्षमता 119.00 दशलक्ष घनफूट इतकी आहे. तर नवीन तलावाची क्षमता 48.25 दशलक्ष घनफूट इतकी आहे.

पावसाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात भुतवड्याचे दोन्ही तलाव यंदा ओव्हर फ्लो झाले. यामुळे जामखेड शहरवासियांसह तलावाच्या लाभक्षेत्रातील शेतकरी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.भूतवडा तलाव भरल्यामुळे जामखेड शहराचा पाणीप्रश्न मिटला आहे. तसेच शेतीच्या पाण्याचाही प्रश्न निकाली निघाला आहे.

जामखेड शहराजवळील काझेवाडी तलाव भरण्याच्या मार्गावर आहे. येत्या दोन तीन दिवसांत हा तलाव भरण्याची शक्यता आहे. जामखेड तालुक्यातील सर्वात मोठा सिंचन प्रकल्प असलेला खैरी मध्यम प्रकल्प दोन दिवसांपुर्वीच ओव्हर फ्लो झालेला आहे. तसेच मोहरी तलाव सुध्दा भरला आहे. तेलंगशी आणि धोत्री हे दोन तलाव अजून भरलेले नाहीत.

यंदा जामखेड तालुक्यात दमदार पाऊस झालेला नाही. अजूनही काही भागात मोठ्या पावसाची आवश्यकता आहे. रब्बी हंगामासाठी मोठा पाऊस होणे आवश्यक आहे. बालाघाटात पडलेल्या पावसाने मोठे तलाव भरले आहेत. सीना नदीच्या लाभ क्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने सीना नदी वाहती झाली आहे.

विंचरणा नदीच्या उपनदीच्या खोऱ्यात दमदार पाऊस झाला. त्याचे पाणी विंचरणेत येत आहे. काझेवाडी तलाव भरल्यानंतर विंचरणेवरील बंधारे पुर्ण क्षमतेने भरण्याचा मार्ग होणार आहे. हस्त नक्षत्रात जामखेड तालुक्यात दमदार पाऊस झाल्यास तालुक्याचा पाणी प्रश्न निकाली निघणार आहे.

Good news,Jamkhed city's water problem solved, Bhutavada lake overflowed,