जामखेड टाइम्स वृत्तसेवा । वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी दरवर्षी दसऱ्याच्या मुहूर्तावर शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची परंपरा सुरू केली होती. परंतू या परंपरेला यंदा खंड पडणार का? अशी भीती व्यक्त होत होती. कारण शिवाजी पार्कवर ठाकरे व शिंदे गटाने दावा ठोकला होता. परंतू हायकोर्टाने ठाकरे गटाच्या बाजूने कौल देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला मोठा दणका दिला होता. आता शिवसेनेच्या दसरा मेळाव्याबाबत एक मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आली आहे.
मुंबई हायकोर्टाने माजी मुख्यमंत्री तथा शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बाजूने निकाल देत यंदाचा दसरा मेळावा शिवाजीपार्कवर घेण्यास परवानगी दिली होती. हायकोर्टाच्या या निकालाविरोधात शिंदे गट सुप्रीम कोर्टाचे दार ठोठावणार असे बोलले जात होते, परंतू आता शिंदे गटाने दसरा मेळाव्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार आहे.
दसरा मेळाव्याबाबत शिंदे गटाची बैठक पार पडली. या बैठकीत शिंदे गटाने मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान न देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसी मैदानावर होणार
तर शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. दसरा मेळाव्यावरून होणारा राजकीय संघर्ष टळला आहे.
शिवसेना विरुद्ध शिंदे गट या संघर्षामुळे राज्यात सत्तासंघर्षाचा पेच अजूनही कायम आहे. सर्वोच्च न्यायालयात यावर काय निर्णय होणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले आहे.