जामखेड पंचायत समितीचे माजी सदस्य अशोक गिरमे यांचे निधन

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड पंचायत समितीचे माजी सदस्य अशोक (आण्णा) गिरमे यांचे निधन झाले. त्यांच्यावर अहमदनगर येथील खाजगी रूग्णालयात उपचार सुरू होते. मात्र शुक्रवारी मध्यरात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे जामखेड शहरावर शोककळा पसरली आहे. दिवंगत अशोक गिरमे हे राष्ट्रवादीचे युवा नेते अमोल गिरमे यांचे चुलते होते.

Former member of Jamkhed Panchayat Samiti Ashok Girme passed away

छातीत दुखत असल्याने दिवंगत अशोक गिरमे यांना अहमदनगर येथील एका खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. गेल्या चार दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र शुक्रवारी मध्यरात्री एक वाजता त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांचे निधन झाले.

दिवंगत अशोक गिरमे हे जामखेड शहरातील अतिशय मनमिळाऊ आणि शांत स्वभावाचे राजकीय नेतृत्व होते. आदर्श शेतकरी म्हणून त्यांचा संपुर्ण तालुक्यात नावलौकिक होता. त्यांनी जामखेड ग्रामपंचायतचे सदस्यपद, जामखेड पंचायत समितीचे सदस्यपद तसेच कडा सहकारी साखर कारखान्याचे संचालकपद भूषवले होते. गिरमे यांच्या निधनामुळे गिरमे परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

अशोक नागनाथ गिरमे हे जामखेड तालुक्यातील शेतीनिष्ठ शेतकरी, प्रामाणिक राजकारणी, तत्वनिष्ट माणूस, अभ्यासु फळ उत्पादक म्हणून ख्याती मिळविलेला एक सर्वमान्य आपला वाटणारा सहकारी आज सर्वांना सोडून गेला आहे, त्यांच्या जाण्याने एक आदर्श हरपला हे निश्चित.त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली, असे म्हणत राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते मधुकर आबा राळेभात यांनी शोक व्यक्त केला आहे.