जामखेड आगाराच्या बसमध्ये बॉम्ब ठेवल्याचा फोन अन् पोलिसांची पळापळ, नेमकं काय घडलं ? वाचा सविस्तर !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : पुण्याहून जामखेडच्या दिशेने येणाऱ्या स्वारगेट – जामखेड बसमध्ये बॉम्ब असल्याच्या फोन काॅलने पोलीस प्रशासनासह प्रवाशांची चांगलीच झोप उडवून दिली. पोलिसांनी सतर्कता दाखवत संबंधित बसची कसून तपासणी केली. मात्र बसमध्ये काहीच संशयास्पद आढळून आले नाही.सदरचा फोन काॅल हा अफवा पसरवणारा होता हे स्पष्ट झाल्याने सर्वांनीच सुटकेचा निश्वास: टाकला. ही घटना कर्जतमधून समोर आली आहे.

Police on the run due to rumors of placing bomb in bus of Jamkhed Aagar, jamkhed Swarget bus, karjat jamkhed news,

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवार, दि ३ रोजी दुपारच्या सुमारास पुणे स्वारगेट-कर्जत-जामखेड ही जामखेड आगाराची बस (एमएच ४०. एक्यू ६२२४) जामखेडच्या दिशेने कर्जतहुन रवाना झाली. अज्ञात युवकाने त्या बसमध्ये बॉम्ब असल्याचा कॉल जामखेड आगारास केला. त्यानुसार कर्तव्यावर असणाऱ्या आगार चालकाने ही माहिती बसचालक आणि वाहकास मोबाईलद्वारे दिली. प्रवाशांना तात्काळ खाली उतरवत त्यांना सुरक्षित स्थळी नेण्यात यावे असे सांगितले.

त्यानुसार चालक उत्तम क्षीरसागर आणि वाहक विनायक गोरे यांनी कर्जत उपनगराच्या बोथरा एजन्सीजवळ बस तात्काळ थांबवत प्रवाशी खाली घेत असताना कर्जतचे पोलीस निरीक्षक मारुती मुलूक आपल्या फौजफाट्यासह त्या ठिकाणी आले. त्यांनी संपूर्ण बसची पाहणी केली असता त्यामध्ये बॉम्ब अथवा बॉम्ब सदृश्य वस्तू आढळून आली नाही. बसमध्ये कोणतीही संशयास्पद वस्तू नसल्याची खातरजमा होताच सर्वांनीच सुटकेचा निश्वास टाकला. त्यानंतर बस जामखेडच्या दिशेने रवाना करण्यात आली.

स्वारगेट- जामखेड बसमध्ये बॉम्ब ठेवला असल्याचा फोन जामखेड आगारास करणाऱ्या संबंधित युवकाला जामखेड पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती कर्जतचे पोलिस निरीक्षक मारुती मुलूक यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

जामखेड आगाराच्या एका बसमध्ये बॉम्ब ठेवल्याचा अफवा पसरवणाऱ्या इसमास ताब्यात घेतले आहे का ? गुन्हा दाखल झालाय ? असे विचारले असता जामखेडचे पोलिस निरीक्षक महेश पाटील यांनी फक्त ‘हो’ म्हणत सदर घटनेची पुष्टी केली आहे.

एका फोन काॅलने उडाली पोलीस प्रशासनासह प्रवाशांची धांदल पण पुढे सर्वांनीच सुटकेचा निश्वास टाकला

कोणीही खोडसाळपणा करू नये.अशा खोडसाळपणामुळे नागरिकांना विनाकारण त्रासास सामोरे जावे लागते. भविष्यात असे दिशाभूल करण्याचे प्रकार पुन्हा घडल्यास त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलीस निरीक्षक मारुती मुलूक यांनी दिला.

जामखेड आगाराच्या बसमध्ये बॉम्ब ठेवल्याची अफवा पसरवणार्‍या इसमावर कोणत्या कलमानुसार गुन्हा दाखल झालाय? तो इसम कोण ? त्याने अशी अफवा का पसरवली? त्याचा नेमका उद्देश काय होता? याबाबत कोणतीही ठोस माहिती उपलब्ध झाली नाही.