अहमदनगर ब्रेकिंग :  गंगामाई साखर कारखान्यातील इथेनॉल प्रकल्पाला लागली भीषण आग, अनेक जण जखमी झाल्याची भीती

जामखेड टाइम्स वृत्तसेवा :  शेवगाव तालुक्यातील नजीक बाभुळगाव येथील गंगामाई साखर कारखान्यातील इथेनॉल प्रकल्पाला आज सायंकाळी सातच्या सुमारास मोठी आग लागली. काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केल्याने आग अटोक्यात आणण्याचे प्रयत्न अपुरे पडत आहेत. त्यासाठी मोठी यंत्रणा राबविण्यात येत आहे. कामगारांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आल्याचा दावा केला जात असला तरी आगीमुळे जवळ जाता येत नसल्याने नेमकी परिस्थिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.

AHMEDNAGAR BREAKING, Massive fire breaks out at Ethanol plant in Gangamai Sugar Factory, many feared injured, shevgaon news,

शेवगाव तालुक्यात हा खासगी साखर कारखाना आहे. तेथे इथेनॉल प्रकल्पही चालविला जातो. त्या प्रकल्पातच आज सायंकाळी ही आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच नगर जिल्ह्यासह शेजारील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातूनही आग्निशामक पथकाला पाचारण करण्यात आले आहे. आगीत किती नुकसान झाले, मनुष्यहानी झाली का? याची माहिती अद्याप उपलब्ध झाली नाही. आग लागली तेव्हा कामगार कामावर होते. आगीनंतर मोठे स्फोट झाल्याचे ग्रामस्थ सांगत आहे. आगीच्या ज्वाळा कित्येक किलोमीटरवून दिसत आहेत.

आगीच्या ज्वाळांचे उग्ररुप इतके भयानक होते की, आगीचे लोळ आसपासच्या पाच ते सहा किलोमीटर अंतरावरील गावामध्ये दिसून येत आहेत. या घटनेत दोन जण किरकोळ जखमी झाल्याचे कळते आहे. आगीचे निश्चित कारण, कारखान्यात किती कर्मचारी अडकले आहेत, तसेच जखमी व वित्तहानी बाबत अधिकृत माहिती मिळू शकली नाही. दरम्यान आगीची माहिती मिळताच आसपासच्या तालुक्यातील साखर कारखाने, विविध संस्थांचे अग्निशमन दलाचे पथक बंबासह घटनास्थळी दाखल झाले आहेत. तर दुसरीकडे ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून विविध भागातील रुग्णवाहिनीकांना पाचारण करण्यात आले असून सर्व कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना वैद्यकिय अधिकारी डॉ. रामेश्वर काटे यांनी दिल्या आहे.

पोलीस निरीक्षक विलास पुजारी हे अधिकारी व कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले आहेत. आगीचे वाढते प्रमाण, दरम्यान टाक्यांचे होणारे स्फोट लक्षात घेऊन, पोलिसांनी कारखाना स्थळाच्या परिसरातील आसपासच्या तीन ते चार किलोमीटर अंतरातील गावातील लोकांना सुरक्षित स्थळी जाण्याच्या सूचना केल्या आहेत. बघ्यांची मोठी गर्दी झाल्याने काही रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. सुमारे आठ ते दहा अग्निशमन दलाच्या पथकाकडून यासाठी मोठे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.