Ashadhi Ekadashi Bakari Eid 2023 : तर कायद्याचा खरा हिसका दाखवू – पोलिस निरीक्षक महेश पाटील यांचा गंभीर इशारा, मंगळवारी जामखेडमध्ये पार पडला पोलिसांचा रूट मार्च
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : आषाढी एकादशी व बकरी ईद हे दोन्ही सण शांततेत साजरे व्हावेत यासाठी सर्वांनी सहकार्य करावं, जामखेड शहर व तालुक्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस प्रशासन सक्षम आहे. परंतू सामाजिक शांतता बिघडवण्याचा, कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा कोणी प्रयत्न केल्यास कोणाचीही गय केली जाणार नाही, त्यांना कायद्याचा खरा हिसका दाखवू, असा इशारा जामखेडचे पोलिस निरीक्षक महेश पाटील यांनी दिला. (PI Mahesh Patil)
आषाढी एकादशी व बकरी ईद हे दोन्ही महत्वाचे सण 29 जून 2023 रोजी साजरे होत आहेत. आषाढी वारीला वारकरी संप्रदायात महत्वाचे स्थान आहे. तर मुस्लिम समाजात त्याग व बलिदानाचं प्रतिक म्हणून बकरी ईद साजरी केली जाते. या ईदला मुस्लिम समाजात महत्वाचे स्थान आहे. यंदा आषाढी एकादशी दिवशी राज्यातील बहुतांश ठिकाणी बकरी ईद साजरी नाही. हिंदू-मुस्लिम सलोख्यात दोन्ही सण साजरे होताना यंदा दिसणार आहेत.
जामखेड पोलिस दलाच्या वतीने आषाढी एकादशी व बकरी ईद या सणांच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी सायंकाळी जामखेड शहरात रूट मार्च काढण्यात आला होता. या रूटमार्चचे नेतृत्व पोलिस निरीक्षक महेश पाटील यांनी केले. या रूट मार्चला जामखेड पोलीस स्टेशन पासुन सुरुवात झाली. बीड कॉर्नर-जयहिंद चौक-काझी गल्ली-सय्यदनगर-खर्डा रोड- तपनेश्वर रोड-नुराणी कॉलनी-खाडे नगर-बस स्थानक-मेन रोड-खर्डा चौक या मार्गावरून हा रुट गेला. या रूट मार्चला एक अधिकारी, 25 पोलीस अंमलदार व 4 होमगार्ड हजर होते.
यावेळी माध्यमांशी बोलताना पोलिस निरीक्षक महेश पाटील म्हणाले की, समाजातील चांगल्या व्यक्ती आमच्या सोबत आहेत. समाजातील शांतता प्रिय व्यक्ती आमच्या सोबत आहेत. त्यामुळे आषाढी एकादशी व बकरी ईद हे दोन्ही सण जामखेड तालुक्यात शांततेत साजरे होतील,असा आम्हाला विश्वास आहे, परंतू जामखेड शहर व तालुक्यात कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहोचवण्याचे काम कोणीही करू नये, जर असं घडल्यास कोणाही समाजकंटकांची गय केली जाणार नाही. कोणीही कितीही मोठा अथवा छोटा असो त्यांना कायद्याचा हिसका दाखवू, अशा इशारा यावेळी पोलिस निरीक्षक महेश पाटील यांनी दिला आहे.
पोलिस निरीक्षक महेश पाटील पुढे म्हणाले की, कायदा व सुव्यवस्थेला बाधा ठरणाऱ्या काही व्यक्तींना आम्ही तडीपार केले आहे. तर काही जणांचे स्थानबद्धतेचे प्रस्ताव तयार केले आहेत. याशिवाय सण उत्सव काळात काही व्यक्तींना जामखेड शहर सोडण्याचे आदेश दिले आहेत. तर काही व्यक्तींवर अटकेची कारवाई केलेली आहे. आम्ही गुन्हेगारांवर कठोर कारवाया करत आहोत. आम्ही सज्जनांचं रक्षण करू तर दुर्जनांचं निर्दालन करू, असे पाटील म्हणाले.