जामखेड : सरप्राईज की चिठ्ठीचा कौल? अवघ्या काही तासांत होणार अंतिम फैसला, जामखेड बाजार समिती कोणाच्या ताब्यात? उत्सुकता शिगेला !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख। जामखेड कृषि उत्पन्न बाजार समितीवर (Jamkhed Market committee) कोणाचा कब्जा? याचा आज 16 मे 2023 रोजी फैसला होणार आहे. बाजार समिती निवडणुकीत (APMC Election) आमदार प्रा.राम शिंदे (Ram Shinde) यांच्या गटाला 9 तर राष्ट्रवादीतील राळेभात गटाला 7 व राष्ट्रवादी सोबत युती केलेल्या विखे गटाला 2 जागा मिळाल्या होत्या. जामखेडकरांनी या निवडणुकीत फिफ्टी -फिफ्टीचा कौल दिल्यानंतर दोन्ही गटाचे नवनिर्वाचित संचालक सहलीवर रवाना झाले होते.आज होणाऱ्या जामखेड बाजार समितीच्या सभापती व उपसभापतीपदाच्या निवडणुकीत ‘सरप्राईज’ मिळणार की ‘चिठ्ठीच्या कौलावर’ सभापती – उपसभापतींची निवड होणार, याचीच उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

Jamkhed market Committee Chairman Deputy Chairman Election 2023, Surprise or Lottery, Jamkhed Bazar Committee Who Owns?decision will be made in just few hours, jamkhed apmc news

जामखेड बाजार समिती निवडणुकीत आमदार प्रा.राम शिंदे आणि आमदार रोहित पवार (rohit pawar) यांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या होत्या. या निवडणुकीत आमदार प्रा.राम शिंदे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना राजकीय ताकद देण्यासाठी स्वबळावर निवडणूक लढवली होती. आमदार रोहित पवारांनी स्वपक्षात असलेले जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात व माजी सभापती सुधीर राळेभात यांच्या गटासोबत युती केली होती. राळेभात बंधूंसोबत विखे गटानेही युती केली होती.आमदार रोहित पवार गटाने ग्रामपंचायत मतदारसंघातून उमेदवार उभे केले होते. इतर सर्व जागा राळेभात गटाला (विखे गटासह) देण्यात आल्या होत्या. यामुळे राष्ट्रवादीत मोठी नाराजी होती.याचा मोठा फटका पवार गटाला बसला. ग्रामपंचायत मतदारसंघातून आमदार पवार गटाचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने पराभूत झाले. गावकारभाऱ्यांनी या निवडणुकीत रोहित पवारांना आपला हिसका दाखवत पुर्णता: नाकारले.हा निकाल रोहित पवारांना मोठा धक्का देणारा ठरला.

जामखेड बाजार समिती निवडणुकीत आमदार प्रा.राम शिंदे यांना सामाजिक कार्यकर्ते प्रा सचिन गायवळ यांनी मोलाची साथ दिली. निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात काँग्रेसने भाजपला पाठिंबा दिला. भाजपच्या नेत्यांपासून कार्यकर्त्यांनी आमदार प्रा.राम शिंदे यांनी आखलेल्या रणनितीची प्रभावी अंमलबजावणी केली होती. या निवडणुकीत आमदार प्रा.राम शिंदे यांच्या गटाचे 9 उमेदवार निवडून आले. या गटाचे उमेदवार जालिंदर चव्हाण हे अवघ्या दहा मतांनी पराभूत झाले. चव्हाण यांचा निसटता पराभव भाजपच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. बाजार समिती निवडणुकीचा निकाल फिफ्टी फिफ्टी असा लागताच दोन्ही गटाचे उमेदवार तातडीने सहलीवर रवाना करण्यात आले होते. सभापती- उपसभापती पदाची निवड जवळ येताच या पदासाठी दोन्ही गटांकडून अनेक नावे चर्चेत आले. परंतू आज होणाऱ्या निवडीत कोणाची लाॅटरी लागणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

आज दुपारी जामखेड कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उप सभापती पदांच्या निवडी पार पडणार आहेत. सहलीवर गेलेले सर्व संचालक आज जामखेडला परतणार आहेत. गेल्या तीन चार दिवसांपासून पडद्याआडून अनेक सोंगट्या फिरवण्यात आल्या आहेत. जामखेड बाजार समितीच्या सत्तेच्या सारीपाटावर कोणती सोंगटी कोठे जाणार ? याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.जामखेड बाजार समितीवर आमचाच सभापती होणार,असा दावा दोन्ही गटांकडून केला आहे. परंतू आज होणाऱ्या निवडीत नेमकं काय घडतं ? याचीच उत्कंठा सर्वांना लागली आहे.

दरम्यान, जामखेड बाजार समितीवर कोणाचा कब्जा? याचा फैसला आज होणार आहे, यावेळी जामखेडकरांना सरप्राईज मिळणार की चिठ्ठीच्या कौलावर बाजार समितीवर कोणाचा कब्जा हे आता अवघ्या काही तासांत स्पष्ट होणार आहे. सभापतीपदासाठी आणि उपसभापती पदासाठी कोण उमेदवार असणार हे अजूनही गुलदस्त्यात आहे. जामखेड बाजार समितीच्या सभागृहात होणाऱ्या निवडीत कोणाची ‘लाॅटरी’ लागणार? कोणाला धोबीपछाड बसणार ? याकडे कर्जत जामखेड मतदारसंघाचे लक्ष लागले आहे.

जामखेड बाजार समिती सभापती – उपसभापती निवडणूक कार्यक्रम खालीलप्रमाणे

1) नामनिर्देशन पत्र वाटप व स्वीकृती – दुपारी 1 ते 1:30 वाजेपर्यंत
2) नामनिर्देशन पत्र छाननी  – दुपारी 1:30 ते 1:45 वाजेपर्यंत
3) वैध नामनिर्देशन यादी प्रसिद्ध करणे – दुपारी 2 वाजता
4) नामनिर्देशन माघार : दुपारी 2 ते दुपारी 2:15 वाजेपर्यंत
5) अंतिम यादी प्रसिद्धी : दुपारी 2 वाजून 20 मिनिटांनी
6) आवश्यक वाटल्यास मतदान प्रकिया : दुपारी 2 : 20 ते 3 वाजेपर्यंत
7) मतमोजणी : दुपारी 3 ते 3:15
8) निकाल : दुपारी 3 : 30