जामखेडमधील गुटखा तस्करीचा अड्डा उध्वस्त, दोघांना ठोकल्या बेड्या, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यातील धोत्री शिवारात गुटख्याचा अड्डा उध्वस्त करण्याची धडक कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने केली. या कारवाईत गुटख्याचा मोठा साठा हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणात तिघा जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर दोघांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.  (Gutkha smuggling den demolished in Jamkhed, two arrested, Action by the local criminal investigation department)

जामखेड तालुक्यातील धोत्री शिवारात गुटख्याचा अवैध्य साठा ठेवलेला असून या ठिकाणाहून गुटख्याची मोठ्या प्रमाणात तस्करी होत असल्याची बातमी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने धोत्री शिवारात धडक कारवाई केली.

या कारवाईत हिरा कंपनीचा सुंगधी तंबाखु मिश्रीत पानमसाला गुटखा हस्तगत करण्यात आला आहे. या धाडीत २ लाख ७६ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. पोलिस कॉन्स्टेबल सागर जंगम यांच्या फिर्यादीवरून रामकिशन उर्फ बाबु उत्तम अडाले ( २६ ) सचिन निवृत्ती गायकवाड (३१) आणि संजय सुभाष जगताप या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यातील दोघांना पोलिसांनी अटक केली असून संजय सुभाष जगताप हा आरोपी फरार झाला आहे. ही धडाकेबाज कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके आणि उपविभागीय पोलिस अधिकारी कर्जत विभाग अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

कारवाईच्या पथकात पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, सहाय्यक फौजदार मन्सूर सय्यद, पोलीस हेडकॉन्स्टेबल विश्वास बेरड, पोलीस नाईक लक्ष्मण खोकले, पोलीस नाईक शंकर चौधरी, पोलीस कॉन्स्टेबल कमलेश पाथरुट, पोलीस कॉन्स्टेबल योगेश सातपुते, चालक पोलीस हेडकॉन्स्टेबल संभाजी कोतकर, पोलीस कॉन्स्टेबल रुदय गौतम घोडके सह आदींचा समावेश होता.

पुढील तपास जामखेड पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राजू थोरात हे करत आहे.