Omicron in Ahmednagar district | धक्कादायक : अहमदनगर जिल्ह्यात ओमिक्रॉनचा शिरकाव

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : संपुर्ण जगाची डोकेदुखी ठरू पाहणारा ओमिक्रॉन कोरोना व्हेरिएंटने महाराष्ट्राच्या चिंता वाढवल्या आहेत. महाराष्ट्रात ओमिक्रॉनचे रुग्ण झपाट्याने वाढू लागले आहेत. अश्यातच अहमदनगर जिल्ह्याची डोकेदुखी वाढवणारी मोठी बातमी आता समोर आली आहे. (Omicron in Ahmednagar district)

अहमदनगर जिल्ह्यात ओमिक्रॉन कोरोना व्हेरिएंटचा शिरकाव झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. नायजेरियाहून अहमदनगरला आलेल्या एका महिलेला ओमिक्रॉनची बाधा झाल्याचे समोर आले आहे. अहमदनगर जिल्ह्यात ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण आढळून आल्यानंतर मोठी खळबळ उडवून दिली आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण श्रीरामपूर तालुक्यात आढळून आला आहे. उत्तर नगर जिल्ह्यात ओमिक्रॉनच्या शिरकावामुळे उत्तरेत चिंतेचे वातावरण पसरले आहे.नायजेरिया येथून श्रीरामपूर येथे आलेल्या 41 वर्षीय महिलेला ओमिक्रॉनची बाधा झाली आहे. ही महिला व तिचा मुलगा काही दिवसापुर्वी नायजेरियाहून भारतात परतले होते. त्यांचे कोरोना जिनोम नमुने पुणे येथील प्रयोगशाळेतील पाठवण्यात आले होते. तपासणी अहवालात सदर महिला ओमिक्रॉन बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे.

राज्यात आणि देशात ओमिक्रॉनच्या रुग्णांत मोठ्या प्रमाणावर वाढ होऊ लागली आहे. एकट्या महाराष्ट्रात 88 ओमिक्रॉन बाधित सक्रीय रूग्ण आहेत. तर देशातील ओमिक्रॉन बाधित रूग्णांची संख्या आता 346 इतकी झाली आहे.