जामखेड : रस्त्यावरील खड्ड्याने घेतला तरूण शेतकऱ्याचा बळी, बैलगाडी उलटल्याने बांधखडकच्या शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यातील बांधखडक येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जनावारांचा चारा घेऊन घरी निघालेल्या तरूण शेतकऱ्यांचा रस्त्यावरील खड्ड्याने बळी घेतला आहे. रस्त्यावरील खड्ड्यात बैलगाडी आदळून उलटल्याने झालेल्या भीषण अपघातात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

जामखेड तालुक्यातील बांधखडक येथील गणेश मधुकर चव्हाण (वय २९) हा तरूण शेतकरी आपले चुलते बाळू गोरख चव्हाण यांच्या समवेत जनवारांचा चारा आणण्यासाठी शेतात गेला होता. त्यानंतर बैलगाडीतून चारा घेऊन घरी येत असतानाच खैरी नदीजवळील रस्त्यावरील एका मोठ्या खड्ड्यात बैलगाडीचे टायर आदळून निसटले आणि बैलगाडी पलटी झाली.ही घटना चव्हाणवस्ती जवळ घडल होती.
या भीषण अपघातात गणेश चव्हाण हा युवक बैलगाडीखाली दबला गेला. या अपघातात त्याच्या मेंदूला गंभीर मार लागल्याने तो गंभीर जखमी झाला होता. तसेच चुलते बाळू चव्हाण हेही जखमी झाले आहेत.गंभीर जखमी गणेशवर खर्डा येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी बार्शीला हलविण्यात आले होते. पण वाटेतच काळाने त्याच्यावर झडप घातली आणि गणेशने जगाचा निरोप घेतला. गणेशवर अत्यंत शोकाकुल वातावरणात बांधखडक येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
मयत गणेश चव्हाण यांच्या मागे वडिल व दोन भाऊ असा परिवार आहे. त्यांची कौटुंबिक परिस्थिती हलाखीची आहे. तरूण शेतकरी गणेश चव्हाण यांच्या अपघाती मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. खर्डा पोलिसांत या घटनेप्रकरणी आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास खर्डा पोलिस करत आहेत.