जामखेड : रस्त्याचा वाद उफाळला; मारहाणीत वृद्धाचा मृत्यू, चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल, एकास अटक, पिंपळगाव उंडा येथील घटना
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यातील पिंपळगाव उंडा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रस्त्याचा वाद उफाळून आल्याने झालेल्या हाणामारीत गंभीर जखमी झालेल्या ७० वर्षीय वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या प्रकरणी खर्डा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून एका आरोपीला २४ तासांत अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणी विष्णु मुरलीधर मोहळकर (वय ५०, रा. पिंपळगाव उंडा) यांनी खर्डा पोलिस स्टेशनलादिलेल्या फिर्यादीवरून रविंद्र अर्जुन शिंदे, कृष्णा रविंद्र शिंदे, समर्थ राजेंद्र शिंदे आणि सुवर्णा रविंद्र शिंदे (सर्व रा. पिंपळगाव उंडा) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
जामखेड तालुक्यातील पिंपळगाव उंडा येथे दि. १२ एप्रिल रोजी सायंकाळी सातच्या सुमारास फिर्यादी यांच्या घरासमोर आरोपींनी येऊन वाद घालत शिवीगाळ व दमदाटी केली. यावेळी आरोपींनी लाकडी काठी व लोखंडी गजाने फिर्यादी, त्यांचा मुलगा तसेच त्यांचे वडील मुरलीधर दगडू मोहळकर (वय ७०) यांच्यावर जोरदार हल्ला चढवत मारहाण केली होती.
या मारहाणीमध्ये मुरलीधर मोहळकर यांना डोक्याला व छातीला गंभीर दुखापत झाली होती. त्यांना उपचारासाठी तातडीने अहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असताना दि. १५ एप्रिल रोजी दुपारी त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे या प्रकरणातील गुन्ह्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३ अन्वये खुनाचा गुन्हा वाढविण्यात आला आहे.
घटना घडताच सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्वलसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पथके तयार करून आरोपींचा शोध सुरू करण्यात आला. त्यानंतर मुख्य आरोपी रविंद्र शिंदे याला २४ तासांच्या आत अटक करण्यात पोलिसांना यश आले असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.
पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कुलबुर्गे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीणचंद्र लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या पथकात सहाय्यक पोलिस निरीक्षक उज्वलसिंह राजपूत, सहायक फौजदार रईस सय्यद ,पोलिस हेड कॉन्स्टेबल संभाजी शेंडे, गोकुळ इंगवले, पोलीस अंमलदार शशी म्हस्के, राहुल शिंदे, गणेश बडे यांचा या पथकात समावेश होता. पुढील तपास खर्डा पोलिस करत आहेत.