सावधान! १९ ते २२ एप्रिल दरम्यान अहिल्यानगरसह महाराष्ट्रात वादळी पाऊस, मेघगर्जना अन् सोसाट्याचा वारा; IMD कडून येलो अलर्ट जारी

जामखेड टाइम्स वृत्तसेवा | दि. १८ एप्रिल | राज्यात वातावरणीय बदलांमुळे पुन्हा एकदा अवकाळी पावसाची चिन्हे दिसत आहेत. भारतीय हवामान विभागाने (IMD) आजच्या (१८ एप्रिल) सायंकाळी जारी केलेल्या अधिकृत बुलेटिननुसार, येत्या १९ ते २२ एप्रिल या चार दिवसांच्या कालावधीत महाराष्ट्रातील मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि कोकण विभागात विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा (ताशी ३०-४० किमी) आणि तुरळक ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Warning,Thunderstorms, rain and gusty winds in Maharashtra including Ahilyanagar from April 19-22-2026, imd yellow alert maharashtra,

कोणत्या भागात कधी पाऊस पडणार ?

१९ एप्रिल (रविवार): मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह तुरळक पावसाला सुरुवात होईल. अहिल्यानगर, पुणे, सोलापूर, बीड, लातूर, छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यातील जिल्ह्यांत सतर्क राहण्याचा इशारा आहे.

२० आणि २१ एप्रिल (सोमवार व मंगळवार): या दोन दिवसांत पावसाची व्याप्ती सर्वाधिक असेल. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यासोबतच विदर्भातही (२०-२१ एप्रिल) वादळी पावसाचा जोर राहील. कोकण व गोव्यातही या दोन दिवसांत पावसाची शक्यता IMD ने नमूद केली आहे. वाऱ्याचा वेग ताशी ३०-४० किमीपर्यंत पोहोचू शकतो.

२२ एप्रिल (बुधवार): पावसाची व्याप्ती आणि तीव्रता हळूहळू कमी होण्यास सुरुवात होईल. मात्र मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ढगाळ हवामानासह तुरळक पाऊस कायम राहू शकतो.

तापमानात घसरण होणार

IMD च्या बुलेटिननुसार, २० ते २४ एप्रिल दरम्यान महाराष्ट्रात कमाल तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून जाणवणाऱ्या उकाड्यातून तात्पुरता दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत.

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे

  • वादळी पाऊस लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी तातडीने पुढील उपाययोजना कराव्यात:
  • काढणी: पिके काढणीला आलेल्या शेतकऱ्यांनी विलंब न करता काढणी उरकावी.
  • साठवणूक: काढलेला शेतमाल, भाजीपाला व फळे सुरक्षित व छताखाली साठवावीत.
  • ताडपत्री: शेतमाल झाकण्यासाठी ताडपत्री किंवा प्लास्टिक कागदाचा वापर करावा.
  • फवारणी थांबवा: कीटकनाशक फवारणी किंवा खत व्यवस्थापन हवामान निवळल्यावरच करावे.

नागरिकांसाठी सूचना

  • मेघगर्जना सुरू असताना झाडाखाली, मोबाईल टॉवरजवळ किंवा पत्र्याच्या शेडखाली उभे राहू नका.
  • वादळी वाऱ्यामुळे झाडे व होर्डिंग पडण्याची शक्यता असते — प्रवासात खबरदारी घ्यावी.
  • अद्ययावत हवामान माहितीसाठी IMD च्या अधिकृत ‘Mausam’ ॲपचा वापर करावा.