संतापजनक घटनेने महाराष्ट्र हादरला ! बाप की हैवान? पोटच्या मुलीवर अत्याचार; चिमुरडी तीन महिन्यांची गर्भवती, दोघांना बेड्या​

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : माणुसकीला काळिमा फासणारी आणि पित्याच्या पवित्र नात्याला धक्का देणारी एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एका साडेतेरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर तिच्याच नराधम पित्याने आणि एका हॉटेल चालकाने लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी जामखेड पोलिसांनी नराधम बाप आणि हॉटेल चालकाला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेप्रकरणी तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

schoking, father hotel owner arrested, minor rape case jamkhed, Sangamner, ahilyanagar,

​आईच्या निधनानंतर बापानेच मांडला खेळ

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही आपल्या आजी, आजोबा आणि वडिलांसह राहत होती. साधारण एक वर्षापूर्वीच तिच्या आईचे निधन झाले आहे. आईचे छत्र हरवलेल्या या चिमुरडीचे रक्षण करण्याऐवजी पोटच्या बापानेच तिच्यावर नोव्हेंबर २०२५ ते मार्च २०२६ या कालावधीत अनेक वेळा अत्याचार केला.

​कुसडगाव परिसरात हॉटेल चालकाचे कृत्य

ऑक्टोबर २०२५ मध्ये दिवाळीच्या सुट्ट्या असल्याने पीडित मुलगी तिचे आजी-आजोबा आणि वडिलांसह जामखेड तालुक्यातील सरदवाडी भागात ऊस तोडणीसाठी आली होती. या काळात पीडित मुलगी आपल्या आजीसोबत पाणी भरण्यासाठी जवळच असलेल्या एका हॉटेलवर जात असे.

याच वेळी हॉटेल चालक जयदत्त सदाशिव कात्रजकर (उर्फ) नाना (रा. कुसडगाव, ता. जामखेड) याची तिच्यावर वाईट नजर पडली. घरातील सर्वजण ऊस तोडणीसाठी बाहेर गेल्याची संधी साधून आरोपी जयदत्त याने मुलीस जवळच असलेल्या मक्याच्या शेतात नेऊन तिच्यावर तीन वेळा अत्याचार केला. तसेच हा प्रकार कोणास सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती.

​मुलगी ३ महिन्यांची गर्भवती

९ एप्रिल २०२६ रोजी पीडित मुलगी आश्रम शाळेत वार्षिक परीक्षा देण्यासाठी गेली होती. त्यावेळी शाळेने मुलीच्या आजीला तिची वैद्यकीय तपासणी (Medical Test) करण्यास सांगितले. संगमनेर ग्रामीण रुग्णालय येथे तपासणी केल्यानंतर पीडित अल्पवयीन मुलगी ३ महिन्यांची गर्भवती असल्याचे समोर आले. या माहितीमुळे सर्वत्र खळबळ उडाली.

​पोलीस कारवाई आणि तपास

संगमनेर पोलिसांनी तातडीने हालचाल करत पीडित मुलगी आणि तिच्या बापास जामखेड पोलिसांच्या ताब्यात दिले. जामखेड पोलीस स्टेशनच्या सपोनि वर्षा जाधव यांनी पीडित मुलीस विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, तिने नराधम बाप आणि हॉटेल चालकाचे नाव सांगितले.

​पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड पोलिसांनी १४ एप्रिल २०२६ रोजी हॉटेल चालक जयदत्त कात्रजकर याला बेड्या ठोकल्या. या प्रकरणी दोघांविरोधात पोलीस स्टेशनला पोक्सो आणि बलात्कारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी प्रविणचंद लोखंडे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.