Rain warning again in Maharashtra | महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा इशारा, जाणून घ्या कधी होणार पाऊस ?

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका वाढलेला आहे. महाराष्ट्रातील काही भाग अक्षरश: गारठून गेला आहे. अश्यातच हवामान विभागाकडून महाराष्ट्रात पाऊस होणार असल्याचा इशारा आज जारी केल्याने बळीराजाच्या चिंता वाढल्या आहेत. (Rain warning again in Maharashtra, know when it will rain?)

हवामान विभागाकडून जारी करण्यात आलेल्या हवामान अंदाजानुसार येत्या 27 डिसेंबर रोजी विदर्भातील काही भागात हलका पाऊस होऊ शकतो तसेच 28 डिसेंबर रोजी महाराष्ट्राच्या काही भागात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. औरंगाबाद, जालना, जळगाव, गोंदिया, भंडारा, वर्धा, नागपुर, आमरावती, अकोला या 09 जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या काळात 30 ते 40 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहू शकतात. काही भागात विजांचा कडकडाट होऊ शकतो असा अंदाज IMDकडून  वर्तवण्यात आला आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला आहे. अनेक शहरं गारठून गेली आहेत. पारा घसरल्याने शेकोट्या पेटल्या आहेत. राज्यातील अनेक प्रमुख शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात कमी तापमान नोंदवले जात आहे. परंतू हवामान विभागाकडून पावसाचा अंदाज व्यक्त झाल्याने तापमानात वाढ होणार आहे. यामुळे गुलाबी थंडीचा कडाका काही प्रमाणात कमी होईल.