ब्रेकिंग न्यूज: सूर्याचा प्रकोप! विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी जिल्हाधिकारी ॲक्शन मोडमध्ये; अहिल्यानगर जिल्ह्यातील शाळांबाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय!
जामखेड टाइम्स वृत्तसेवा, दि. १७ : वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या शाळांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. दि. १८ एप्रिल २०२६ पासून उन्हाळी सुट्टीपर्यंत शाळा सकाळी ७ ते ११ या वेळेत भरतील, असा आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. पंकज आशिया यांनी दिला आहे.

भारतीय हवामान खात्याने जिल्ह्यासाठी उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट जारी केला आहे. उष्माघाताचे दुष्परिणाम टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अंतर्गत हा आदेश देण्यात आला आहे.
शाळांनी व्यवस्थापन समितीची मंजुरी घेऊन अंमलबजावणी करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. संबंधित निर्णयाची माहिती सर्व मुख्याध्यापकांपर्यंत पोहोचविण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
शिक्षकांनी परीक्षेचे कामकाज पूर्ण करण्यासाठी सकाळी ७ ते १२ या वेळेत शाळेत उपस्थित राहणे आवश्यक राहील.