जामखेड पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल, दोघे जण अटकेत !

जामखेड टाईम्स वृत्तसेवा । कलरच्या दुकानात बसलेल्या एका तरूणावर लोखंडी राॅडच्या सहाय्याने प्राणघातक हल्ला करण्याची धक्कादायक घटना जामखेड शहरात घडली. या प्रकरणी जामखेड पोलिस स्टेशनला दोघा जणांविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करत अटक करण्यात आली आहे.

याबाबत पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की,जामखेड शहरातील नगर रोड भागात राहणारा आजमेर आदम शेख हा 18 वर्षीय युवक शहरातील तपनेश्वर रोड भागात असलेल्या आपल्या मामाच्या एम एस पेन्ट या दुकानात बसलेला होता. त्याचवेळी सागर बजरंग मोहळकर हा तरूण हातात लोखंडी राॅड घेऊन दुकानात आला.त्यावेळी तो आजमेर शेख याला म्हणाला की, तुझा मामा कुठे आहे? त्याला जास्त झाले आहे का ? म्हणून शिवीगाळ करु लागला.

त्यावेळी आजमेर हा मोहळकर याला म्हणाला की, तु शिवीगाळ करू नको, मामा आल्यावर तुम्ही तुमचे पहा असे म्हणाल्याचा मोहळकर याला राग आल्याने मोहळकर याने शिवीगाळ करत तुला तर संपुनच टाकतो,असे म्हणुन त्याच्या हातातील लोखंडी राॅडने आजमेर शेख यांच्या डोक्यावर हल्ला केला. तो हल्ला आडवत असतानाच आजमेर याच्या उजव्या हाताच्या मनगटाजवळ जबर मार लागुन त्याला गंभीर दुखापत झाली.

अचानक झालेल्या हल्ल्याने घाबरलेला आजमेर हा काऊंटरमध्ये लपून बसला होता. परंतू सागर मोहळकर याने आजमेरला काऊंटरमधून ओढून दुकानासमोरील रस्त्यावर जोरदार आपटले. यात आजमेर याच्या डोक्याला हाताला मार लागून जखमी झाला. या संपुर्ण मारहाणीच्या घटनेवेळी सागर मोहळकर याचे वडील त्याच्या सोबत होते असे फिर्यादीत म्हटले आहे. ही घटना 1 फेब्रुवारी रोजी दुपारी बाराच्या सुमारास घडली.

दरम्यान या प्रकरणी जामखेड पोलिस स्टेशनला आजमेर शेख या तरूणाने फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार सागर बजरंग मोहळकर व बजरंग मोहळकर दोन्ही रा.जांबवाडी ता.जामखेड या दोघांविरोधात कलम 307, 323, 324, 504, 34 नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

जामखेड पोलिसांनी दोन्ही आरोपींना तात्काळ अटक केली आहे. या कारवाईच्या पथकात पोलीस कॉन्स्टेबल आबासाहेब आवारे, विजयकुमार कोळी, अरुण पवार सह आदींचा समावेश होता.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक राजु थोरात हे करत आहेत.