शेती पंप चोरणारा चोरटा गजाआड, 4 मोटारी हस्तगत, जामखेड गुन्हा शोध पथकाची धडक कारवाई

जामखेड टाईम्स वृत्तसेवा । ग्रामीण भागात विद्युत मोटारी चोरी होण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. विद्युत मोटारी चोरणाऱ्या चोरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरू लागलेली आहे. अश्यातच जामखेड पोलिस दलातील गुन्हा शोध पथकाने खर्डा भागातील विद्युत मोटारी चोरणाऱ्या एका चोराच्या मुसक्या आवळत चार विद्युत मोटारी हस्तगत करण्याची कारवाई पार पाडली आहे.

याबाबत पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, जामखेड पोलिस स्टेशनला 18 जानेवारी रोजी गुन्हा रजिस्टर नंबर 20/2022 अन्वये कलम 379,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्ह्याचा गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार हे तपास करीत होते. 20 जानेवारी रोजी बाळगव्हाण येथील बाबा दयानंद खाडे याने सदर चोरी केल्याची गुप्त माहिती गुन्हे शोध पथकाला मिळाली. त्या आधारे पोलिसांनी बाबा खाडे या 21 वर्षीय तरूणाला बाळगव्हाण येथून ताब्यात घेण्यात आले.

खाडे याला पोलिस स्टेशनला आणुन त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. सदरच्या गुन्ह्यात त्याचा भाऊ योगेश दयानंद खाडे व एक अल्पवयीन आरोपी त्याचे साथीदार असल्याचे बाबा खाडे याने पोलिसांना सांगितले.

त्यानंतर पोलिसांनी बाबा खाडे व त्याचा अल्पवयीन साथीदार याच्याकडून सदर गुन्ह्यात चोरीस गेलेली 1 शेती पंप व इतर 3 शेती मोटारपंप हस्तगत केले.  या कारवाईत पोलिसांनी मुख्य आरोपी बाबा खाडे याला अटक केली असून 4 विद्युत मोटारी जप्त केल्या आहेत.

जामखेड तालुक्यात सध्या सुगीचे दिवस सुरू आहेत. शेतकरी रब्बी पिकांना जगवण्यासाठी धडपड करत आहेत. शेतीला पाणी देण्यासाठी आवश्यक विद्युत मोटारी चोरीचे प्रमाण वाढले आहे.

ज्या प्रकारे बाळगव्हाण भागातील विद्युत मोटारी चोरणारा चोरटा गजाआड झाला, त्या प्रकारे तालुक्यातील इतर चोरीच्या घटनांचा तातडीने तपास लागून चोरटे गजाआड करण्याची धडाकेबाज कारवाई  जामखेड पोलिसांनी पार पाडून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.

सदरची कारवाई पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड, पोलिस उपनिरीक्षक राजु थोरात, पोलिस नाईक संभाजी शेंडे, पोलिस नाईक अविनाश ढेरे, पोलिस काँस्टेबल संग्राम जाधव, संदिप राऊत,विजय कोळी, आबा आवारे, अरूण पवार, संदिप आजबे यांनी केली आहे.