उसवत्या सांजवेळी : कर्जतच्या स्वाती पाटील यांचा नवा कविता संग्रह आला वाचकांच्या भेटीला !

जामखेड टाईम्स वृत्तसेवा । कर्जत – जामखेड विधानसभा मतदारसंघात साहित्याची परंपरा तशी नगण्यच, बोटावर मोजता येणारे कवी, लेखक या मातीतून उभे राहिले.परंतू काळ जस जसा बदलत चाललाय तसा या मातीतून साहित्य क्षेत्रात नवीन नावे समोर येऊ लागले आहेत. यातील राज्यात गाजत असलेलं नाव म्हणजे स्वाती पाटील हे होय !

स्वाती पाटील यांचा जन्म चापडगावचा. सध्या त्या कर्जत शहरात आपल्या कुटुंबीयांसह राहतात. गृहिणी असलेल्या स्वाती पाटील यांनी कवितेच्या क्षेत्रात दमदार पाऊल टाकत राज्यात कर्जतचे नाव झळकावले आहे. शेती माती सह स्त्रीचे जगणे अतिशय भेदक शब्दांत त्या आपल्या कवितेतून मांडत आल्या आहेत. राज्यातील शेकडो कवी संमेलने त्यांनी गाजवली आहेत.

स्वाती पाटील लिखीत ‘उसवत्या सांजवेळी’ हा कविता संग्रह वाचकांच्या भेटीला आला आहे. स्वाती पाटील यांचा हा दुसरा कविता संग्रह आहे. यापुर्वी त्यांचा स्पंदन हा पहिला कविता संग्रह प्रसिद्ध झालेला आहे. उसवत्या सांजवेळी या कविता संग्रहास सुप्रसिद्ध गीतकार बाबासाहेब सौदागर यांची प्रस्तावना आहे.

“समंजस, तरल हळवेपणाच्या भाववृत्तीची ही कवयत्री आपल्या कवितेमधून व्यक्त होताना कलात्मक लयीने तर मुक्तछंदाने या संग्रहामधून ‘उसवत्या सांजवेळी हे अनुभव साजिवंत करते. आयुष्याला सावरताना वेदनेचे अश्रू पचवून त्यांची कविता तिचं स्वतंत्र्य शालीन गरतीपण घेऊन आलेली आहे. मराठी भाषेतील स्त्री कवयित्रींच्या समृध्द परंपरेचा वारसा स्वाती पाटील पुढे चालवित आहेत.” – बाबासाहेब सौदागर – सुप्रसिद्ध चित्रपट गीतकार, लेखक, कवी, अभिनेते.

“उसवत्या सांजवेळी कवितासंग्रहाचे एकेक पान उलगडत असतानाचा प्रवास हा उत्कंठा, विविधता यांनी भारलेला तर आहेच शिवाय या गुलदस्त्यातील काव्यफुलांच्या भावनांची दरवळ कायम स्वरूपी मनात ठेवून जाणारा असा हा काव्यसंग्रह आहे” – हर्षित अभिराज, सुप्रसिद्ध संगीतकार

“कवितेची मातीशी असलेली नाळ किती घट्ट आहे, हे शिर्षक तसे प्रेमकाव्य, नातेसंबधं, विरह, दुःख, वेदना या प्रतिकात्मकतेच्या दृष्टीने महत्त्वाचे वाटते मात्र त्यापलिकडे जाऊन पाहण्याचा दृष्टीकोन जो आपल्या कवितेतून कवयित्रीने मांडला आहे तो वाखाणण्याजोगा आहे.” -हनुमंत चांदगुडे, सुप्रसिद्ध, गीतकार

उसवत्या सांजवेळी हा दुसरा कविता संग्रह वाचकांच्या हाती देताना स्वाती पाटील म्हणतात..

उधाणले हे साही ऋतू अन्
बघ मनाचा झाला पसारा..
या उसवत्या सांजवेळी
ये कविते दे सहारा…!

आयुष्याच्या हर एक वळणावर, हर एक उसवत्या सांजवेळी जेव्हा जेव्हा कवितेला अंतर्मनातून हाक दिली, तेव्हा तेव्हा कवितेनेही तितक्याच आतून त्या हाकेला साद घातली आणि माझी हरएक संवेदना मी पानापानांत पेरीत गेले. कवितेशी हितगुज करत असताना,रितं होत असताना उध्वस्त झालेल्या वादळवाटांना भेदून क्षितिजापार सरसावणाऱ्या नजरेला आभाळ पेलण्याची ऊर्मीसुद्धा कवितेनेच तर दिली. आणखी काय हवंय..?

शब्दांमधून व्यक्त होण्याचं हे समाधान कुठल्याही लिहित्या हातांसाठी  कितीतरी लाख मोलाचं असतं. माझ्या शब्दांचं हेच सार उसवत्या सांजवेळी या काव्यसंग्रहाच्या रुपानं आपल्या हाती देत असताना माझ्या कवितेला खऱ्या अर्थानं अर्थ प्राप्त होत असल्याचा आनंद मला होत आहे असे स्वाती पाटील आपल्या मनोगतात म्हणतात.

काव्यसंग्रहाचे नाव : उसवत्या सांजवेळी
प्रकाशक :  परिस पब्लिकेशन,पुणे
मुखपृष्ठ – अरविंद शेलार
पाने– १२०
स्वागत मुल्य-१५० (पोस्टेज खर्चासहित)
संपर्क (फोन पे,गुगल पे)-7218127439
स्वाती पाटील, कर्जत