अखेर अंदुरे हल्ला प्रकरणात डॉ भगवान मुरूमकर यांना अटक, न्यायालयाने सुनावली 4 दिवसांची पोलिस कोठडी

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । जामखेड येथील व्यापारी उमेश अंदुरे आणि शशिकांत अंदुरे यांच्या कुटुंबावर झालेल्या हल्ला प्रकरणातील आरोपी जामखेड पंचायत समितीचे माजी सभापती डॉ भगवान मुरूमकर यांना अटक करण्यात आली आहे. मुरूमकर यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 4 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.या प्रकरणातील आतापर्यंत सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर एक आरोपी अद्यापही फरार आहे.

Finally Dr Bhagwan Murumkar arrested in Andure attack case, court ordered 4 days police custody

तीन महिन्यांपुर्वी जामखेड शहरातील अंदुरे कुटुंबियांवर हल्ला करण्याची घटना घडली होती. या प्रकरणात जामखेड पंचायत समितीचे माजी सभापती डॉ भगवान मुरूमकर यांच्यासह त्यांच्या सहा साथीदारांविरोधात जामखेड पोलिस स्टेशनला गुन्हे दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून सर्व आरोपी फरार झाले होते. त्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध घेतला होता.आरोपी विक्रम भगवान डाडर, सोनू बबन वाघमारे, सागर सतिश डिसले, अमोल किसन आजबे, सागर बापुराव टकले अशा पाच आरोपींना अटक करण्यात आली होती. मात्र डॉ भगवान मुरूमकर व भरत पांडुरंग जगदाळे हे आरोपी फरार होते.

दरम्यान डॉ भगवान मुरूमकर हे बीड जिल्ह्यातील पाटोदा परिसरात असल्याची माहिती मिळताच जामखेड पोलिसांनी मुरूमकर यांच्या अटकेसाठी सापळा लावत मुरूमकर यांना अटक केली. ही कारवाई 28 रोजी पहाटे अडीच वाजता करण्यात आली. ही कारवा पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड, पोलीस काँन्टेबल आबासाहेब आवारे, पोलीस नाईक अविनाश ढेरे, संग्राम जाधव, पो. काँ. संदिप राऊत, संदिप आजबे यांच्या पथकाने केली.

भगवान मुरूमकर यांना जामखेड न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेतील फरार आरोपी भरत पांडुरंग जगदाळे याच्या अटकेसाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. लवकरच जगदाळे गजाआड असेल असा विश्वास जामखेड पोलिसांनी व्यक्त केला आहे.