जामखेड : अखेर ‘तो’ माथेफिरू जामखेड पोलिसांच्या ताब्यात, न्यायालयाने सुनावली 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । जामखेड तालुक्यातील नान्नज गावात सहा ठिकाणी बाॅम्ब ठेवण्यात आले आहेत, ते कधीही फुटू शकतात, असा फोन करून राज्याच्या पोलिस दलाची झोप उडवून देणारा ‘तो’ माथेफिरू अखेर जामखेड पोलिसांच्या ताब्यात आला आहे. त्याला आज 22 रोजी जामखेड न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने कलम 354 च्या गुन्ह्यात त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

नान्नज बाॅम्ब अफवा प्रकरणाच्या आठ दिवस आधी दिनेश सुतार विरोधात जामखेड पोलिस स्टेशनला कलम 354 चा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्याने नान्नज बाॅम्ब अफवा प्रकरण घडवून आणले. या प्रकरणात कलम 177, 182, 505 (1)(B) प्रमाणे जामखेड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी दिनेश सुतारच्या अटकेसाठी जामखेड पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया हाती घेतली होती. अखेर बुधवारी मुंबई पोलिसांकडून त्याचे हस्तांतरण करण्यात आले.

जामखेडचे पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक अजय साठे, पोलिस काँस्टेबल संदिप आजबे, पोलिस काँस्टेबल नवनाथ शेकडे यांच्या पथकाने मुंबई गाठली. बुधवारी आरोपी दिनेश सुतार याला मुंबई पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले.आरोपी सुतार याला कलम 354 च्या गुन्ह्यात वर्ग करण्यात आले आहे. त्याला आज जामखेड न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान,नान्नज बाॅम्ब अफवा प्रकरणात त्याला उद्या न्यायालयात हजर केले जाणार आहे, अशी माहिती पोलिस सुत्रांनी दिली.
काय घडलं रविवारी ?
जामखेड तालुक्यातील नान्नज येथील बालाजी मेडिकलमध्ये सहा बॉम्ब ठेवले आहेत, असा फोन दिनेश सुतार या माथेफिरू तरूणाने रविवारी मुंबई पोलिस नियंत्रण कक्ष, अहमदनगर नियंत्रण कक्ष व जामखेड पोलिसांना केले होते. यानंतर पोलिस यंत्रणांनी नान्नज गावात कसून तपासणी केली होती. मात्र यात काहीच निष्पन्न झाले नाही. सदरचा फोन हा अफवा पसरवणारा होता, हे स्पष्ट झाले.यामुळे नान्नज ग्रामस्थांसह पोलिस दलाने सुटकेचा निश्वा:स टाकला.
सोमवारी माथेफिरू मुंबई पोलिसांच्या ताब्यात
दिनेश सुतार या माथेफिरू इसमाने मुंबईच्या झवेरी बाजारासंदर्भात तसेच नान्नजमध्ये बाॅम्ब ठेवले आहेत अशी अफवा पसरवणारा फोन केला होता. यामुळे राज्याची पोलिस यंत्रणा दिनेश सुतारच्या अटकेसाठी कामाला लागली होती. अखेर मुंबई पोलिसांंनी वेगाने तपास करत दिनेश सुतारच्या सोमवारी मुसक्या आवळल्या होत्या.
घटनेचे खरे मुळ फेसबुक मैत्रीत
नान्नज बाॅम्ब अफवा प्रकरण घडवून आणणारा आरोपी दिनेश सुतार हा सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील रहिवासी आहे. या माथेफिरू तरूणाची फेसबुकवरून जामखेड तालुक्यातील एका महिलेशी ओळख झाली होती. त्या महिलेशी फेसबुकवर मैत्री झाल्यानंतर दोघांमधील संवाद वाढला होता. परंतू दिनेश हा वेेडसर असल्याचे त्या महिलेच्या लक्षात आल्यानंतर तीने त्याच्याशी बोलायचं बंद केले होते. तरीही तिच्याशी वेगवेगळ्या माध्यमांतून तो संपर्क साधून सतत तिला त्रास देत असायचा, या त्रासाला कंटाळून त्या महिलेने त्याच्याविरोधात कलम 354 नुसार जामखेड पोलिस स्टेशनला मागील आठवड्यात गुन्हा दाखल केला होता.
तेव्हापासून दिनेश हा वेगवेगळ्या शासकीय यंत्रणांच्या टोल फ्री क्रमांक फोन करायचा. तसाच फोन त्याने पोलिस दलाच्या नियंत्रण कक्षालाही केला. आणि सर्वांनाच कामाला लावले. बाॅम्ब ठेवल्याची अफवा पसरवून त्याने राज्यात खळबळ उडवून दिली. मात्र मुंबई पोलिसांनी वेगाने तपास करत त्याच्या मुसक्या आवळल्या आणि घटनेवर पडदा पाडला.
संबंधित तरूण मनोरुग्ण
दिनेश सुतार हा सांगोला तालुक्यातील रहिवासी असुन तो मनोरुग्ण आहे. त्याच्यावर मिरज मधील एका रुग्णालयात उपचार केले जात होते. पण तेथून तो गायब झाला. तो सतत वेगवेगळ्या लोकांना फोन करून त्रास देत असल्याची माहिती पुढे येत आहे. एका प्रकरणात तो काही वर्षांपुर्वी जेलमध्ये होता, सध्या तो मुंबईच्या एल टी मार्ग पोलिसांच्या ताब्यात होता. त्याला जामखेड पोलिसांनी बुधवारी ताब्यात घेतले आहे.
सोशल मीडियाचा वापर करताना काळजी घेण्याची गरज
सध्या सोशल मिडीयाचा मोठ्या प्रमाणावर वापर वाढला आहे. प्रत्येकाच्या हातातील स्मार्टफोनमुळे जग मुठीत आले आहे. आयुष्यात कधी न भेटलेल्या माणसांकडे सोशल मीडियावर मन मोकळे करण्याचे प्रकार वाढले आहेत. सोशल मिडीया जितका चांगला तितकाच वाईटचं असतो हे अनेकदा घडणाऱ्या घटनांतून अधोरेखित होत आले आहे. सोशल मिडीयावरील फसवणूकीला महिला सर्वाधिक बळी ठरतात. त्यामुळे सोशल मीडियाचा वापर करताना अधिक सतर्कता बाळगणे आवश्यक आहे.