वादळाचा तडाखा : जामखेड महसूल विभागाने हाती घेतले पंचनामे, पाटोदा भवरवाडीत 31 घरांची पडझड, लाखोंचे नुकसान, पहा नुकसानीचे फोटो

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्याला बुधवारी वादळाचा जबरदस्त तडाखा बसला,यात अनेक घरांचे पत्रे उडुन गेल्याने मोठे नुकसान झाले. तसेच शेतातील फळबागांची झाडे उन्मळून पडली.या वादळामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.महसूल प्रशासनाने वादळग्रस्त भागात आजपासून पंचनामे सुरु केले आहेत.

बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास तालुक्यातील पाटोदा भवरवाडी खामगाव सह आदी भागात चक्रीवादळाचा तडाखा बसला होता. या चक्रीवादळात या भागातील अनेकांच्या घरावरील पत्रे उडून गेली होती.

तसेच शेतातील फळबागांमधील झाडे उखडली गेली होती. यामध्ये शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. जामखेड महसूल प्रशासनाने वादळग्रस्त भागात आज पासून नुकसानीचे पंचनामे सुरू केले आहेत.

जामखेड महसूल प्रशासनाने पाटोदा भवरवाडी या भागात वादळाने पत्रे उडून गेलेल्या घरांचे आज पंचनामे केले. तलाठी समीर शेख, कोतवाल निलेश शिंदे, ग्रामसेवक खुरंगळे, कृषी सहाय्यक हांगे यांनी वादळग्रस्त भागात पंचनामे पूर्ण केले.

पाटोदा येथील 11 तर भवरवाडी येथील 20 अश्या 31 घरांचे पंचनामे आज करण्यात आले आहेत,अशी माहिती तहसीलदार योगेश चंद्रे यांनी जामखेड टाइम्सशी बोलताना दिली आहे.

वादळग्रस्त भागामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या शेतातील फळबागांचे नुकसान झाले आहे त्या फळबागांचे पंचनामे उद्यापासून सुरू होणार आहेत अशी माहिती महसूल विभागाकडून देण्यात आली आहे.

दरम्यान आज जामखेड महसूल विभागाने वादळग्रस्त भागात केलेल्या पंचनाम्याचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आला आह. वादळी पावसामुळे ज्या घरांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत त्यांना भरीव आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील असे तहसीलदार योगेश चंद्रे म्हणाले.