धक्कादायक : पाथर्डी तालुक्यात पंकजा मुंडे समर्थकाचा आत्महत्येचा प्रयत्न

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : भाजपा नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना विधान परिषदेची उमेदवारी नाकारल्याने मुंडे समर्थकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. औरंगाबादमध्ये मुंडे समर्थकांनी भाजपा कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला, तर दुसरीकडे अहमदनगर जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे.(Pathardi taluka Pankaja munde supporter attempted suicide)

भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची उमेदवारी नाकारल्याचे पडसाद अहमदनगर जिल्ह्यातही उमटताना दिसत आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील स्वर्गीय गोपीनाथ मुंडे आणि भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांना मानणारा मोठा वर्ग आहे. अहमदनगर जिल्ह्याच्या पाथर्डी तालुक्यातील एका कट्टर मुंडे समर्थकांने टोकाचे पाऊल उचलल्याची घटना समोर आली आहे.

भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांना भाजपने विधानपरिषदेची उमेदवारी न दिल्याने भावना अनावर झालेल्या पाथर्डीतील मुकुंद गर्जे या मुंडे समर्थक कार्यकर्त्याने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गर्जे यांच्या सोबत असलेल्या काही कार्यकर्त्यांनी वेळीच गर्जे यांना रोखल्याने मोठा अनर्थ टळला.

दरम्यान भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांना भाजपने विधान परिषदेची उमेदवारी न दिल्याचे पडसाद आता राज्यभरात उमटत आहेत. मराठवाड्यातील औरंगाबाद परभणी जिल्ह्यातही मुंडे समर्थक आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. ताई नाहीतर भाजप नाही अशा आशयाचे बॅनरबाजी मुंडे समर्थक करताना दिसत आहेत. एकूणच मुंडे समर्थकांमध्ये भाजपा विरोधात नाराजीची तीव्र लाट येत आहे. (Munde supporters are aggressive as they have rejected Pankaja Munde’s candidature)

एकीकडे राज्याच्या अनेक भागात मुंडे समर्थक आक्रमक झाल्याचे दिसून येत आहेत, मात्र दुसरीकडे पंकजा मुंडे यांचा बालेकिल्ला असलेल्या बीड जिल्ह्यात मात्र अजूनही शांतता असल्याचे दिसून येत आहे. पंकजा मुंडे ह्या सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडीवर काय भूमिका मांडणार याकडे मुंडे समर्थकांसह राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.