जामखेड तालुक्यातील 87 गावात महसूल विभाग राबवणार विशेष सहाय्य योजना अभियान, जाणून घ्या सविस्तर माहिती

जामखेड टाईम्स वृत्तसेवा । जामखेड तालुक्यातील 87 गावांमध्ये महसूल विभागाच्यावतीने विशेष सहाय्य योजना अभियान राबविण्यात येणार आहे अशी माहिती जामखेडचे तहसीलदार योगेश चंद्रे
यांनी दिली.

शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ वृद्धापकाळ योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना, इंदिरा गांधी विधवा योजना,इंदिरा गांधी अपंग निवृत्ती वेतन योजना आणि राष्ट्रीय आर्थिक कुटुंब लाभ योजना या योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी याकरिता महसूल विभागाच्या वतीने विशेष सहाय्य योजना अभियान हाती घेण्यात आले आहे.

विशेष सहाय्य योजनांचा लाभ समाजातील प्रत्येक पात्र लाभार्थींना मिळावा कोणीही पात्र लाभार्थी वंचित राहू नये यासाठी महसूल विभागाकडून जामखेड तालुक्यातील 87 गावांमध्ये 11 फेब्रुवारीपर्यंत विशेष अभियान राबविण्यात येणार आहे.

आमदार रोहित पवार यांच्या अध्यक्षतेखाली महसूल विभाग, ग्रामविकास विभाग, नगरपालिका विभाग, कृषी विभाग यांच्या अधिकारी आणि ग्रामस्तरीय यंत्रणा यांची ऑनलाईन बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत विशेष सहाय्य योजना अभियान राबवण्याचा निर्णय झाला.सर्व विभागांनी या अभियानामध्ये सहभाग घेऊन जास्तीत जास्त पात्र लाभार्थी यांचे फॉर्म भरून घेणेबाबत सूचना करण्यात आल्या.

गावपातळीवर पात्र लाभार्थ्यांनी भरलेले फॉर्म आपल्या गावच्या तलाठी यांच्याकडेस जमा करावे.फॉर्म भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे यांची यादी तलाठी कार्यालयात दिलेली आहे.

पात्र लाभार्थी यांनी विहित नमुन्यात आणि संपूर्ण कागदपत्र जोडून आपले फॉर्म तलाठी यांच्याकडेस जमा करावे.सदर अभियानाचा फायदा हा सर्वसामान्य घटकाला होणार असल्याने जास्तीत जास्त पात्र लाभार्थी यांनी या अभियानाचा लाभ घ्यावा असे अवाहन तहसीलदार योगेश चंद्रे यांनी केले आहे.