कर्जत तहसिल परिसरातील दलालांनो आता सावधान : तहसीलदारांनी दिला ‘हा’ इशारा !

जामखेड टाईम्स वृत्तसेवा ( कर्जत बातमीदार) : कर्जत तहसिल कार्यालयाच्या आवारात दलालांचा सुळसुळाट झाला आहे. तहसिल विभागाकडून राबवल्या जात असलेल्या विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देतो असे सांगून लाभार्थ्यांकडून आर्थिक लुटमार केली जात असल्याचे बोलले जात आहे. याच पार्श्वभूमीवर कर्जतचे तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी दलालांचा बंदोबस्त करण्यासाठी आता कठोर पाऊले उचलले आहेत.

जर एखादी व्यक्ती तहसील कार्यलयाच्या नावाखाली लाभार्थीना आर्थिक रक्कम मागत असेल तर त्या दलालांची नावे तहसील कार्यालयाला कळवा संबंधितावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा तहसीलदार आगळे यांनी दिला आहे.

सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत श्रावणबाळ सेवा राज्‍य निवृत्‍ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्‍ट्रीय वृध्‍दापकाळ निवृत्‍तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्‍ट्रीय विधवा योजना, संजय गांधी निराधार अनुदान योजनाअंतर्गत  वृध्‍द, विधवा, अपंग, निराधार, परित्‍याक्‍त्‍या, अनाथ व दुर्धरआजाराने ग्रस्‍त असलेल्‍या लाभार्थ्‍यांना तहसील कार्यालयाद्वारे शासन लाभ दिला जातो.

सदर योजनेअंतर्गत प्राप्‍त अर्जावर कार्यवाही करणेकामी सद्यस्थितीत तहसीलदार कर्जत यांचे अध्यक्षतेखाली वेळोवेळी संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीची बैठक घेतली जाते. परंतु मागील काही दिवसांमध्ये सदर बैठकीत असे निदर्शनास आले आहे कि, काही त्रयस्त व्यक्ती अथवा एजंट यांच्याकडून लाभार्थी यांना प्रकरण मंजुरीचे आमिष दाखवून पैशाची आर्थिक लुट करतात.

विशेष सहाय्य योजने अंतर्गत लाभार्थींना शासनामार्फत आर्थिक लाभ दिला जातो, यासाठी शासन निर्णयाप्रमाणे आवश्यक अर्ज फी ३३ रुपये असून, विहित नमुन्यातील अर्ज व आवश्यक पुरावे जोडून संबंधित लाभार्थी यांनी आपले सरकार केंद्राकडे अर्ज जमा करावेत.

जर आपले सरकार सेवा केंद्रचालक लाभार्थीकडून शासकीय फी व्यतिरिक्त अवास्तव रक्कम आकारत असतील अथवा काही त्रयस्थ व्यक्ती किंवा एजंट लाभार्थी यांच्याकडे प्रकरण मंजुरीकामी काही पैशांची मागणी करत असतील तर याबाबत लाभार्थीनी रितसर तहसील कार्यालयाकडे तक्रार करावी.

लाभार्थ्यांची आर्थिक लूटमार करणाऱ्या आपले सरकार केंद्र चालकांवर अथवा त्रयस्थ व्यक्तींविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा थेट इशारा तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी दिला आहे.

लाभ चालू असणा-या किंवा ज्यांना लाभ सुरु करावयाचा आहे अशा लाभार्थ्यांनी कोणत्याही कारणास्तव त्रयस्त व्यक्तींनी दिलेल्या अमिषाला बळी पडू नये असे आवाहन तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी केले आहे.