जामखेड टाईम्स वृत्तसेवा (सत्तार शेख) पवार कुटूंब राजकारण आणि समाजकारणात देशभरात प्रसिध्द आहे. याच कुटूंबातील सुनंदाताई पवार ह्या सामाजिक कामाचा मोठा चेहरा बनून राज्यात काम करत आहेत.प्रसिध्दी, सत्कार, हार- तुरे यात सुनंदाताई कधीच रमत नाहीत. कामाशी कटिबद्ध राहून अविरत कार्यरत राहणाऱ्या सुनंदाताईंच्या आयुष्यात सोमवारचा दिवस मात्र खास ठरला.
कुठलेही आई बाप लेकरांच्या कर्तृत्वाने जेव्हा सन्मानित होतात तेव्हा तो सन्मान त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा सन्मान असतो. असाच सन्मान सुनंदाताई पवार यांच्या आयुष्यात सोमवारी आला. निमित्त होते पंचायत समितीच्या सभापती राजश्री मोरे व राष्ट्रवादीचे नेते सूर्यकांत मोरे यांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमाचे.
रोहित पवारांसारख्या कर्तृत्ववान पुत्राला जन्म देणाऱ्या आईचा सन्मान करण्यासाठी मोरे कुटुंबीयांनी नवरात्रौत्सवानिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. जामखेड तालुक्यातील देवदैठणच्या जागृत अश्या खंडोबाच्या साक्षीने सुनंदाताई पवार यांची पेढेतुला करण्यात आली.या सन्मानाने सुनंदाताई पवार भारावून गेल्या होत्या.
राष्ट्रवादीचे नेते सूर्यकांत मोरे म्हणाले..
आमदार रोहित पवारांसारखा कर्तृत्ववान पुत्र ज्या मातेने जन्माला घातला त्या मातेचा सन्मान करणे व तिचे ऋण फेडण्यासाठी पेढेतुला या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.आमदार रोहित पवारांमुळे कर्जत जामखेडचे नाव देशपातळीवर गेले आहे. मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाचा सन्मान वाढला आहे म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते असे राष्ट्रवादीचे नेते सूर्यकांत मोरे यांनी स्पष्ट केले.
सुनंदाताई पवार झाल्या भावनिक
आपला मुलाच्या चांगल्या कामामुळे माझा सन्मान होत आहे याचे मला खुप मोठे समाधान आणि अभिमान आहे. मला कधीच असे कार्यक्रम आवडत नाहीत. परंतू मोरे कुटुंबाच्या भावना लक्षात घेता मी कार्यक्रमासाठी तयार झाले. यावेळी बोलताना सुनंदाताई काहीश्या भावनिक झाल्या होत्या.
कर्तृत्ववान आईच्या पोटी जन्म झाला हे माझे भाग्य – रोहित पवार
कर्तृत्ववान मातेच्या पोटी माझा जन्म झाला ही वस्तुस्थिती आहे. माझ्या अल्प कामाचा समाज आणि मतदारसंघाला उपयोग होत असेल तर त्यामागे आई, पवार कुटूंब आणि भारतीय संस्कृतीचे संस्कार कारणीभूत आहेत. मोरे परिवाराच्या प्रेमाबाबत त्यांचे आभार अशी प्रतिक्रिया आमदार रोहित पवार यांनी आज फेसबुक पोस्ट टाकत दिली आहे.
यावेळी कार्यक्रमासाठी सामाजिक कार्यकर्त्या सविताताई व्होरा, सभापती राजश्री मोरे, राष्ट्रवादीचे नेते सूर्यकांत मोरे, माजी पंचायत समिती सदस्य विजयसिंह गोलेकर,सूर्यकांत मोरे यांच्या मातोश्री पार्वती मोरे , कैलास महाराज भोरे, अशोक धेंडे सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.