कर्जत-जामखेडला मिळणार ३ आमदार; कोण आहेत सुनील कर्जतकर? जाणून घेऊयात त्यांचा राजकीय प्रवास ​

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : सत्तार शेख। “कोणताही राजकीय वारसा नसताना, पक्षकार्यात सलग ४०-५० सक्रीय राहणं ही  सोप्पी गोष्ट नाही, पण एका विचारासाठी आयुष्य झिजवणारे आजही आहेत, त्यातील एक नाव म्हणजे सुनिल कर्जतकर हे होय. कर्जतकर यांच्या प्रदीर्घ संघर्षाला आणि पक्षनिष्ठेला न्याय मिळाला असून नान्नज (ता.जामखेड) ते विधानपरिषद हा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. जाणून घेऊयात त्यांच्या विषयी सविस्तर. (Sunil Karjatkar Biography)

Sunil karjatkar Biography, karjat jamkhed, nannaj, bjp news

सुनील कर्जतकर यांच्या विधानपरिषद उमेदवारीमुळे कर्जत-जामखेड मतदारसंघ आता राज्याच्या राजकारणातील सर्वात ‘पॉवरफुल’ मतदारसंघ ठरला आहे. या मतदारसंघातून रोहित पवार (आमदार) आणि प्रा राम शिंदे (विधान परिषद आमदार) हे विधीमंडळात प्रतिनिधित्व करत आहेत. आता सुनील कर्जतकर यांच्या रूपाने या मतदारसंघाला तिसरा आमदार लाभणार आहे. एकाच मतदारसंघातून तीन-तीन आमदार असण्याची ही राज्यातील दुर्मिळ घटना असून, यामुळे जामखेडचा राजकीय दबदबा राज्यात वाढल्याचे बोलले जात आहे.

​कोण आहेत सुनील कर्जतकर? (Sunil Karjatkar Biography)

​जामखेड तालुक्यातील नान्नज सारख्या छोट्या गावातून सुनिल कर्जतकर यांचा सुरू झालेला राजकीय व समाजकारणातील प्रवास थक्क करणारा आहे. कोणताही राजकीय वारसा नसताना केवळ निष्ठेच्या जोरावर त्यांनी राजकारणात मोठा पल्ला गाठला आहे.

​१. संघर्षातून नेतृत्व: आणीबाणीत १८ महिने कारावास

सुनील कर्जतकर यांच्या राजकीय प्रवासाचा पाया पुण्यातून रचला गेला. ७० च्या दशकात शिक्षणासाठी पुण्यात असताना त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे (ABVP) काम सुरू केले. १९७५ मध्ये ते पुणे शहर अभाविपचे सरचिटणीस म्हणून जबाबदारी सांभाळत असतानाच देशात आणीबाणी जाहीर झाली. तेव्हा त्यांना १५ महिने कारावास भोगावा लागला होता. कारावासातून बाहेर आल्यानंतर त्यांनी आपल्या मूळ गावी, नान्नज येथे परतून आधुनिक शेतीला सुरुवात केली आणि द्राक्ष बागायतदार म्हणून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली.

​२. भाजपचे ‘सायलेंट’ रणनीतीकार

कर्जतकर हे महाराष्ट्र भाजपमधील एक अनुभवी संघटक मानले जातात. त्यांनी भाजपमध्ये संघटनमंत्री म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. सध्या ते महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आणि पक्षाच्या निवडणूक सेलचे संयोजक म्हणून काम पाहत आहेत. पडद्यामागे राहून निवडणुकीची गणिते जुळवण्यात ते माहीर असून, २०११ च्या नगरपंचायत निवडणुकीत त्यांनी राज्य निवडणूक प्रमुख म्हणून बजावलेली भूमिका आजही महत्त्वाची मानली जाते.

​३. ‘द्राक्षांचे माहेरघर’ नान्नजचे शिल्पकार

राजकारणासोबतच कर्जतकर यांनी कृषी क्षेत्रातही क्रांती घडवली आहे. त्यांनी आपल्या नान्नज गावात पहिली द्राक्ष बाग यशस्वी करून दाखवली. त्यांच्या प्रेरणेतून आज नान्नज गाव ‘द्राक्षाचे माहेरघर’ म्हणून ओळखले जाते. पारंपरिक शेतीला फाटा देऊन आधुनिक शेती कशी करावी, याचा आदर्श त्यांनी घालून दिला आहे.

ग्रामीण भागात भाजपचा विस्तार आणि संघटन कौशल्य

डिसेंबर १९८० मध्ये कर्जतकर यांनी नान्नज सारख्या लहान गावात भाजपची शाखा स्थापन करून खऱ्या अर्थाने ग्रामीण भागात पक्षाचे काम सुरू केले. त्यावेळी दत्तात्रय राऊत, रामसिंग परदेशी, रोहिदास जोकरे, देविदास कोळपकर, गणपत मोहळकर यांसारख्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन त्यांनी शून्यातून संघटन उभे केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली १९९५ च्या नान्नज ग्रामपंचायत निवडणुकीत १७ पैकी १४ जागा जिंकून भाजपने ऐतिहासिक विजय मिळवला होता. त्याकाळी प्रस्थापितांविरुद्ध बंड पुकारत राजकीय उलथापालथ घडवून आणली होती. तेव्हापासून नान्नज हे गाव भाजपचा बालेकिल्ला मानला जात आहे.

सुनिल कर्जतकर हे भाजपच्या वरिष्ठ फळीतील, पडद्यामागे राहून संघटनेला बळकट करणारे आणि निवडणूक नियोजनात पारंगत असलेले नेते मानले जातात. त्यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुण्यात झाले. प्रारंभीच्या काळात संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते तुळशीराम मुळे, कांता पाटील, हिरालाल गुंदेचा, बंडोपंत देशमुख यांच्यासमवेत त्यांनी जामखेडमध्ये तालुकास्तरीय काम केले.

भाजपात झपाटून काम करत असताना त्यांनी पक्षसंघटनेत मजबुत स्थान निर्माण केले. पक्षाच्या वाईट काळात त्यांनी अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. नाशिक आणि पश्चिम महाराष्ट्राचे प्रभारी म्हणून काम करताना त्यांनी अनेक कार्यकर्त्यांना पक्षात आणले आणि पक्ष विस्तारला, पक्षाने दिलेली प्रत्येक जबाबदारी लीलया पार पाडत त्यांनी पक्षाला समर्पित केले. ज्याची दखल घेत पक्षश्रेष्ठींनी आज त्यांना आमदारकीच्या रूपाने मोठी जबाबदारी दिली आहे.

​नान्नजमध्ये ग्रामस्थांचा जल्लोष

​सुनील कर्जतकर यांच्या उमेदवारीची घोषणा होताच जामखेडसह त्यांच्या मूळगावी, नान्नजमध्ये फटाके फोडून आणि पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला. ग्रामस्थांनी आनंदोत्सव साजरा केला.

​निष्ठेचा विजय!

​गेल्या ५० वर्षांपासून पदाची अपेक्षा न ठेवता, जनसंघापासून भाजपपर्यंत एकनिष्ठ राहिलेल्या कार्यकर्त्याला आज आमदारकीची संधी मिळाली आहे. “पदापेक्षा विचारांसाठी झिजणाऱ्या कार्यकर्त्याचा हा सन्मान आहे,” अशी भावना भाजप कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे.