महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज: उध्दव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची होणार भेट, भाजप नेत्यांनी मदत केली, दिपाली सय्यद यांचे खळबळजनक ट्विट !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : राज्याच्या राजकारणात मागील महिनाभरापासून मोठ्या उलतापालथी घडत आहेत, सत्ताधारी शिवसेनेतील आमदाराच्या गटाने बंडखोरी करून महाविकास आघाडी सरकार उलथवले.त्यानंतर भाजपसोबत शिवसेनेतील बंडखोर आमदारांच्या गटाने सत्ता स्थापन केली. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या गटाचे नेते एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले.शिवसेनेत झालेली बंडखोरीमुळे देशाच्या राजकारणात खळबळ उडाली होती.

महाराष्ट्रात निर्माण झालेल्या सत्ता संघर्षाचे पडसाद अजूनही राज्याच्या राजकारणात उमटत आहेत. शिवसेना विरुद्ध मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट हा सामना राज्याच्या राजकारणात रंगला आहे. सुप्रीम कोर्टातही शिवसेना विरूद्ध शिंदेगट अशी लढाई सुरू आहे.शिवसेनेकडून बंडखोर आमदार आणि पदाधिकाऱ्यांच्या हकालपट्टी करण्याचा धडाका पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हाती घेतला आहे. तसेच उद्धव ठाकरे हे राज्यभरातील शिवसैनिकांशी दररोज संवाद साात आहेत. तर दुसरीकडे युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी निष्ठा यात्रा काढत शिवसैनिकांशी संवाद साधण्यास प्रारंभ केला आहे.

त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडेही शिवसेनेतील काही नेते दाखल होत असल्याचे चित्र दिसत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटांमध्ये समझोता होऊन दिलजमाई व्हावी यासाठी अनेक जण प्रयत्नशील आहेत, मात्र दोन्ही बाजूने टीकेचे बाण रोज सोडले जात आहेत. यामुळे शिवसेनेत निर्माण झालेली दुफळी आणि बंडखोरी म्यान होण्याचे चिन्ह दिसत नाहीत.

अश्यातच शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी एक ट्विट करत राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. येत्या दोन दिवसात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पहिल्यांदा चर्चा करायला एकत्र येणार असल्याचे समजले अशा स्वरूपाचे ट्विट करून दिपाली सय्यद यांनी राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चर्चेसाठी एकत्र यावे यासाठी भाजपच्या नेत्यांनी मदत केली असल्याचे सांगा दिपाली सय्यद यांनी भाजप नेत्यांचे आभार आपल्या ट्विटमध्ये मानले आहेत. शनिवारी रात्री उशिरा सय्यद यांनी ट्विट करत याबाबतची माहिती जारी केली आहे.

दिपाली सय्यद यांनी ट्विटमध्ये नेमकं काय म्हटले आहे ?

शिवसेना नेत्या दिपाली सय्यद आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, येत्या दोन दिवसात आदरणीय उद्धव साहेब आणि आदरणीय शिंदे साहेब शिवसैनिकांच्या भावनांचा आदर करून पहिल्यांदा चर्चा करायला एकत्र येणार हे समजल्यावर खूप बरे वाटले. शिंदे साहेबांना शिवसैनिकांची तळमळ समजली आणि उद्धव साहेबांनी कुटुंब प्रमुखाची भूमिका मोठ्या मनाने निभावली हे स्पष्ट झाले आहे. या मध्यस्थी करता भाजपा नेत्यांनी मदत केली याबाबत धन्यवाद ! चर्चेच्या ठिकाणाची प्रतीक्षा असेल. असे ट्विट करत सय्यद यांनी खळबळ उडवून दिली आहे.

तावडे आणि मुंडे यांना ट्विट टॅग

शिवसेना आमचीच असा दावा करणाऱ्या शिंदे गटाबरोबर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे समझोता करणार का? याचीच उत्सुकता आता महाराष्ट्राला लागली आहे. दरम्यान दिपाली सय्यद यांनी केलेल्या ट्विटमध्ये भाजपाचे केंद्रीय नेते विनोद तावडे आणि पंकजाताई मुंडे यांना त्यांनीही टॅग केले आहे. शिवसेनेतील बंडखोरीवर तोडगा काढण्यासाठी तावडे आणि मुंडे यांनी पुढाकार तर घेतला नाही ना याचीही चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.

today's Big breaking news in  Maharashtra politics, Uddhav Thackeray - Eknath Shinde to meet for discussion in next two days, Deepali Sayed's exciting tweet