राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी शरद पवार यांची निवड, आठव्या राष्ट्रीय अधिवेशनात राष्ट्रवादी मांडणार विरोधी पक्षांच्या एकजुटीचा फाॅर्म्यूला !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडिया येथे पार पडलेल्या राष्ट्रीय कार्यसमितीच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी शरद पवार यांची पुन्हा एकदा बिनविरोध निवड झाली आहे. राष्ट्रवादीच्या कार्यसमितीत एकमताने पवार यांच्या नावाचा ठराव मंजूर झाला.

Sharad Pawar again president of NCP, unanimously approved resolution, NCP will present the formula of unity of opposition parties in the eighth national convention

आज शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली. शरद पवार यांच्या नेतृत्वात या देशामध्ये पुरोगामी, धर्मनिरपेक्ष सर्वसमावेशक विचारांचा प्रसार करू व भारतीय लोकशाही बळकट करु असे ट्वीट राष्ट्रवादीकडून करण्यात आले आहे.

राष्ट्रवादीच्या दिल्लीत पार पडलेल्या राष्ट्रीय कार्यसमितीच्या बैठकीत पवार यांची सर्वानुमते अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली. या बैठकीला शरद पवार यांच्यासह विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे यांच्यासह पक्षाचे आमदार, खासदार आणि सर्व ज्येष्ठ नेते उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनाआधी विरोधी पक्षांच्या ऐक्यासाठी दिल्लीत सुरू झालेले भेटीगाठींचे सत्र पाहता या अधिवेशनाच्या निमित्ताने भाजपला धक्का देण्यासाठी विरोधी पक्षांच्या एकजुटीचा फाॅर्म्यूला राष्ट्रवादी मांडणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.विरोधी पक्षाच्या नेत्यांचे मनोमिलन करण्यासाठी पाटना, कोलकाता तसेच मुंबईत संयुक्त कार्यक्रम घेतले जावेत, अशी सूचनाही राष्ट्रवादीमधून पुढे आल्याचे कळते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आठवे राष्ट्रीय अधिवेशन रविवारी होणार आहे. या अधिवेशनात राजकीय त्याचप्रमाणे आर्थिक सामाजिक, कृषी विषयक, महिला सक्षमीकरण, परराष्ट्र संबंध यावरील ठरावही संमत केले जाणार असले तरी त्यात विरोधी पक्षांच्या एकजुटीची आवश्यकता आणि रुपरेषेची मांडणी महत्त्वाची असेल, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

विरोधी ऐक्यासाठी किमान समान कार्यक्रमाचे सूतोवाच शरद पवार यांनी अलीकडेच केले होते. त्यापार्श्वभूमीवर सूत्रांनी सांगितले, की राजकीय विचारसरणीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीत समानता आहे. जेडीयू, सप यांच्यात आणि काँग्रेसमध्ये वैचारिक मतभेद नाहीत. माकप सरचिटणीस सीताराम येचुरी ऐक्याबाबत व्यवहार्य भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत. तेलंगण राष्ट्र समिती पक्षही काँग्रेसशी तडजोडीच्या मनस्थितीत आहे.