जामखेड : राष्ट्रवादीच्या विजयसिंह गोलेकरांचा भाजपवर पलटवार, तर अश्या चूका आम्ही वारंवार करणार, गोलेकरांनी भाजपला ठणकावले !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख। बारामती ॲग्रोवरून भाजप आणि राष्ट्रवादीत चांगलीच जुंपली आहे. राष्ट्रवादीने आमदार राम शिंदे यांच्याविरोधात खर्ड्यात अंदोलन केले. त्यानंतर भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष शरद कार्ले यांनी प्रसिध्दीपत्रक काढत राष्ट्रवादीवर हल्ला चढवला होता. आता राष्ट्रवादीकडून भाजपवर पलटवार करण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे जिल्हा संघटक विजयसिंह गोलेकर यांनी भाजपच्या शरद कार्ले यांनी केलेल्या टीकेचा नाव घेता जोरदार समाचार घेतला आहे. यामुळे आता जामखेडमध्ये राष्ट्रवादी विरूद्ध भाजप असा आरोप प्रत्यारोपांचा धुराळा जोरात उडू लागला आहे.
यावेळी आपली भूमिका मांडताना राष्ट्रवादीचे जिल्हा संघटक विजयसिंह गोलेकर म्हणाले की,आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मेरीट पाहूनच कार्यकर्त्यांना संधी दिली जाते;चमकोगिरी करणाऱ्यांना नव्हे. चुकीला चूक म्हणणे म्हणजे चमकोगिरी नव्हे.चूक कोणाची हे साखर आयुक्तांनीच दाखवून दिले आहे. बारामती ॲग्रो कारखान्याला क्लीन चीट मिळाली आहे.
कालचा साखर आयुक्तांकडील व्यर्थ वेळ आमदार राम शिंदे यांनी मतदारसंघातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शिवारात जात त्यांची कैफीयत सरकार दरबारी मांडण्यासाठी वापरला असता तर ते जास्त भावले असते असे म्हणत शिंदे यांना चांगलेच फटकारले.
हा तर भाजपच्या पदाधिकाऱ्याचा अज्ञानीपणा
आमच्या आंदोलनाविरुध्द प्रसारमाध्यमांना प्रतिक्रीया देणाऱ्या भाजपाच्या पदाधिकाऱ्याचा अज्ञानीपणा दिसून आला. त्यांनी गाळपाच्या शेवटी शेतकऱ्यांच्या ऊसाला कमी भाव मिळत असल्याचे म्हटले आहे. वास्तविक पाहता, एखाद्या कारखान्याने ऊसाचा भाव ठरवल्यास त्याचा फायदा शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत सगळ्यांनाच सारख्या प्रमाणात भेटतो आणि पवारांचे कारखाने चांगले भाव देण्यासाठी माहीर असून त्यामुळेच शेतकऱ्यांचा ओढा तिकडे असतो. परंतू साधा गुळ तयार करण्याचे गुराळही न चालवणाऱ्यांना ते कसे कळणार? असे म्हणत गोलेकर यांनी भाजपच्या शरद कार्लेंचे नाव घेता हल्ला चढवला.
विकासकामांना स्थगिती देण्याऐवजी त्या तोडीचा..
गोलेकर पुढे म्हणाले की, राहीला विषय विकासकामांचा तर आमदार रोहितदादा पवार यांच्या माध्यमातून मतदारसंघात झालेल्या कोट्यावधी रुपयांच्या विकासकामांमुळेच ते अबालवृद्धात लोकप्रिय झाले आहेत, याला कोणीही नाकारु शकत नाहीत. सत्तेचा गैरवापर करुन रोहित पवारांच्या मंजूर विकासकामांना स्थगिती देण्याऐवजी त्या तोडीचा निधी आणण्यासाठी आपली शक्ती पणाला लावावी हीच मागणी सर्वसामान्य नागरीक करत आहेत.
कारखान्याला त्रास देण्याची चूक करण्याऐवजी ती
जामखेड तालुक्यात एकच साखर कारखाना असून त्याची गाळप क्षमता कमी असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांना बाहेरच्या जिल्ह्यातील साखर कारखान्यांवर अवलंबून रहावे लागते ही वस्तुस्थिती आहे. कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांना ना.अजित पवारांच्या अंबालिका कारखान्याचा मोठा आधार असून जामखेड मधील शेतकऱ्यांना मात्र बारामती एग्रो सारख्या चांगली सेवा देणाऱ्या कारखान्याची गरज आहे. त्यातच या भागातील शेतकऱ्यांना वाढीव मदत करण्यासाठी आ.रोहित पवार यांनी या कारखान्याची गाळप क्षमताही वाढवली आहे. त्यामुळे जामखेडकर शेतकऱ्यांना मदत करणाऱ्या कारखान्याला त्रास देण्याची चूक करण्याऐवजी ती शक्ती शेतकऱ्यांना इतर पर्यायातून मदतीचा हात देण्यासाठी आमदार राम शिंदे आणि भाजपने खर्च करावी, अशी टीका गोलेकर यांनी केली.
तर अश्या चूका आम्ही वारंवार करणार
कर्जत जामखेड मतदारसंघाला एक नवी ओळख व प्रतिष्ठा देण्याचे काम आ. रोहित पवार यांनी केले असून त्याचा प्रत्यय मतदारसंघाच्या बाहेर पडल्यास येतो हे कोणीच नाकारु शकत नाही.भीषण दुष्काळात आ.रोहित पवार यांनी मतदारसंघातील जनतेलाच नव्हे तर महाराष्ट्रातील आवश्यक ठिकाणी टॅंकरची सुविधा देत पाणी पाजले. कोरोना काळातही मतदारसंघातील जनतेच्या उपचाराची जबाबदारी घेतली व राज्यभरही वैद्यकीय सुविधा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. जनावरातील लंपी आजारावरील लसीकरण शासनाच्या मदतीसह स्वखर्चानेही केले त्यामुळे त्यांची संकटमोचक अशी प्रतिमा तयार झाली आहे.त्यांचा थोडातरी आदर्श घेऊन विरोधकांकडून काम व्हावे,अशी माफक अपेक्षा आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याने व्यक्त करणे हे जर चूक असेल तर अश्या चूका आम्ही वारंवार करणार असल्याचेही गोलेकर यांनी ठणकावले.