अखेर खर्ड्यातील मदारी समाजाला मिळाला न्याय !

जामखेड: विमुक्त जाती,भटक्या जमाती या प्रवर्गातील घटकांचे राहणीमान उंचावणे,त्यांच्या उत्पन्नाचे स्त्रोत वाढवून त्यांना स्थिरता प्राप्त व्हावी यासाठी सामाजिक न्याय विभागांतर्गत यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना राबविण्यात येते.तसेच या प्रवर्गातील बेघर,भुमिहीन कुटुंबांना शासकीय जमिनीवर घरे बांधण्यासाठी जागा व निधी उपलब्ध करून देण्यात येतो.  जामखेड तालुक्यातील खर्डा (ता.जामखेड )येथे मदारी समाजातील अशी अनेक बेघर भुमिहीन कुटुंबे आहेत.या कुटूंबांना राहण्यासाठी कसलाही निवारा नाही.अगोदरच्या सरकारच्या काळात याठिकाणी मदारी वसाहतीसाठी मंजुरी मिळाली होती मात्र ती केवळ कागदोपत्रीच होती. या वसाहतीसाठी देण्यात आलेली जागा अनेक कारणांमुळे प्रत्यक्षात येथील लोकांच्या ताब्यात मिळाली नव्हती त्यामुळे निधी उपलब्ध असुनही हा महत्वाकांक्षी प्रकल्प पुर्णत्वास नेता येत नव्हता.मात्र राष्ट्रवादीचे युवा नेते,आ.रोहित पवार यांनी सुरुवातीपासुनच यासाठी प्रयत्न चालू केले होते व त्यातच भटक्या जाती विमुक्त जमातीच्या समितीचा पदभार त्यांच्याकडे आल्याने त्यांनी हा विषय अतिशय गांभीर्याने हाताळून याबाबत अधिकार्‍यांशी सातत्याने पाठपुरावा करून येथील अडचण कायमस्वरूपी सोडविण्यासाठी पुढाकार घेतला.

नुकतीच अनेक अडचणींमुळे रेंगाळत असलेला हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्याच्या दृष्टीने अतिशय महत्वपूर्ण असलेली जागा ताब्यात देण्यासाठी अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यता दिली आहे.गेली ३ ते ४ वर्षांहून अधिक काळ रेंगाळलेला हा प्रकल्प रोहित पवार यांच्या सातत्याच्या पाठपुरावा व प्रयत्नांमधून पूर्ण होणार असून भटक्या जाती विमुक्त जमातीमधील बेघर व भूमिहीन बांधवांसाठी आपल्या हक्काचे घर मिळणार आहे. 

खर्डा येथील मदारी समाजाला हक्काचे घरकुले मिळावीत यासाठी साामाजिक संघटनांनी अंंदोलन करत लक्ष वेेधले होते. यामुळे मदारी समाजाला न्याय कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आमदार पवार यांनी प्रश्न मार्गी लावत समाजाला न्याय दिल्यााने मदरी समाजात आनंदाचे वातावरण पसरले आहे.