एकनाथ खडसेंनी पक्षांतराचे उघडले गुपित; म्हणाले “या” कारणामुळे राष्ट्रवादीची निवड केली

जळगाव । प्रतिनिधी

किल्लारीच्या भूकंपग्रस्तांना मदतीचा हात देऊन त्यांना उभे करण्याचे महत्वपूर्ण काम शरद पवारांनी ज्या कौशल्याने केले; त्याला तोड नाही. समाजात असे लोक फार मोजके असतात. अनेक जण जन्माला येतात. जन्माला येणारा प्रत्येक जण मरणार आहे. किती वर्षे जगले, यापेक्षा कसे जगले, काय कर्तृत्व केले, याला महत्त्व आहे, असे गौरवोद्गार काढत पवारांनी महाराष्ट्रात जे काम करून दाखवले, ते कुणाच्या स्वप्नातही नव्हते. महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवारांनी अशक्यप्राय गोष्ट शक्य करून दाखवली. एवढ्या जणांची एकत्र मोट बांधून त्यांनी राज्यात महाविकास आघाडीची सत्ता स्थापन करून चमत्कार दाखवून दिला असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी केले.

“राजकारणात एकमेकांकडे तोंड करून देखील न बसणारे नेते असतात. मात्र, अशा परिस्थितीतही सर्वपक्षातील नेत्यांशी जिव्हाळ्याचे संबध जपणारे नेते म्हणजे शरद पवार ( Sharad Pawar)  होय. त्यांनी साऱ्याच पक्षातील सर्वांशी सलोख्याचे संबध टिकवून ठेवले आहेत, अशा शब्दांत नुकतेच राष्ट्रवादीत प्रवेश केलेले नेते एकनाथ खडसे ( Eknath khadase) यांनी शनिवारी शरद पवार यांच्यावर स्तुतीसुमनांचा वर्षाव केला.”

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी केंद्रियमंत्री शरद पवार यांचा शनिवारी जळगावात वाढदिवस साजरा करण्यात आला. यानिमित्ताने शहरातील कांताई सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसकडून व्हर्च्युअल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात उत्तर महाराष्ट्राचे प्रतिनिधी म्हणून जळगावातून एकनाथ खडसे यांनी शरद पवार यांच्याविषयी भावना व्यक्त केल्यात. या कार्यक्रमाला माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी खासदार ईश्वरलाल जैन, माजी आमदार मनीष जैन, संतोष चौधरी, गुरुमुख जगवानी, जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील, जिल्हा बँकेच्या अध्यक्षा अॅड. रोहिणी खडसे, महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संजय गरुड, महिला जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील आदींसह जिल्हाभरातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलो ते कुठेतरी ओलावा होता म्हणून आलो, असेही खडसेंनी यावेळी सांगितले. चांगल्या नेत्याच्या हाताखाली काम करण्याची संधी मला मिळाली, याचा मला आनंद आहे. पवारांनी माझ्यासारख्या अनेकांना संधी देऊन मोठं केले आहे. शरद पवार हे सर्वगुण संपन्न नेते आहेत. राजकारणाचा भाग सोडा. समाजकारणाच्या माध्यमातून साहित्य, कला, क्रीडा क्षेत्रातही त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केल्याचेही खडसे यांनी सांगितले