Jamkhed political news | राष्ट्रवादीची मेगा भरती : विरोधी गोटात अस्वस्थता, कोण कोण सोडणार पक्ष ? उत्सुकता शिगेला
जामखेड टाईम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । Jamkhed political news | राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वेगाने वाहू लागले आहे. सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी वेगाने हाती घेतली आहे. सगळीकडेच फोडाफोडीच्या राजकारणाने वेग पकडला आहे.
कर्जत – जामखेड मतदारसंघात येत्या 30 नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादीकडून मेगाभरतीची मोहिम फत्ते केली जाणार आहे. जामखेड तालुक्यात सध्या पक्षांतराचे वारे वाहू लागले आहे. येत्या 30 नोव्हेंबर रोजी पक्षांतराचा मोठा बार उडवला जाणार आहे. आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत अनेक जण राष्ट्रवादीत दाखल होणार आहेत. भाजपातील अनेक बडे कार्यकर्ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत जवळ्याचे सरपंच प्रशांत शिंदे व उपसरपंच काकासाहेब वाळूंजकर हे आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादीत डेरेदाखल होणार आहेत.शिंदे व वाळूंजकर यांच्यासह जवळा जिल्हा परिषद गटातून आणखी किती जण राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. त्यांची नावे अजून तरी सार्वजनिक करण्यात आलेली नाहीत. परंतू कोण कोण भाजप सोडणार ? किंवा अन्य पक्षातून कोण कोण राष्ट्रवादीत येणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
जामखेड तालुक्यातील नान्नजमध्ये 30 रोजी सायंकाळी होणाऱ्या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमातून राष्ट्रवादीकडून अगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीचे एकप्रकारे रणशिंग फुंकले जाणार आहे. या कार्यक्रमात राष्ट्रवादी जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याची शक्यता आहे.
दरम्यान 30 रोजी होणारा कार्यक्रम हा पुर्वी जवळ्यात होणार होता. परंतू जवळा ग्रामपंचायतीच्या एका प्रभागासाठी पोटनिवडणुक होत असल्याने अचारसंहिता लागु आहे. यामुळे जवळ्यातील कार्यक्रम नान्नजला होत आहे. नान्नजमध्ये होणाऱ्या या कार्यक्रमात राष्ट्रवादीत दाखल होणारे कार्यकर्ते जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहेत अशी माहिती समोर येत आहे.
दरम्यान जवळा गटात पक्षांतराच्या घडामोडीमुळे राष्ट्रवादीच्या विरोधातील गोटात अस्वस्थता पसरली आहे. 30 रोजी होणाऱ्या कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य, सरपंच व उपसरपंचांनी जाऊ नये यासाठी फिल्डिंग लावली जात असल्याची चर्चा आहे. फोनाफोनी व पदांचे आमिष दाखवून कार्यकर्त्यांना रोखले जात आहे. राष्ट्रवादीचा कार्यक्रम हाणून पाडण्याचा डाव तर खेळला जात नाही ना ? अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.
तूर्तास 30 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या पक्ष प्रवेशाच्या सोहळ्यात राष्ट्रवादीत कुणा कुणाचा प्रवेश होतो याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.