Maharashtra Omicron Update | मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी दिला इशारा : लाॅकडाऊन नको असेल तर…. 

मुंबई : (Maharashtra Omicron Update) दक्षिण आफ्रिकेत (South Africa) आढळून आलेल्या ओमिक्रॉन (Omicron) विषाणूने जगाच्या चिंता वाढवल्या आहेत.वेगानं प्रसार होणारा हा विषाणू अधिक धोकादायक असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आज महत्वाची बैठक बोलावली होती.

या बैठकीत महत्वाच्या उपाययोजनांवर चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांनी कोरोनाच्या धोकादायक नव्या विषाणूला रोखण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते सर्व करा, अशी सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. तसंच पुन्हा एकदा लॉकडाऊन नको असेल तर आरोग्याची बंधनं पाळावी लागतील, असा थेट इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत आज टास्क फोर्सची बैठक घेण्यात आली. या बैठकीत ओमिक्रॉन विषाणूबाबत सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला महत्वाचे आदेश दिले आहेत.

लॉकडाऊन नको असेल तर…

कोविडच्या धोकादायक नव्या विषाणूला रोखण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते सर्व करा. केंद्राच्या सूचनांची वाट न पाहता तातडीने कामाला लागा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिले आहेत. तसंच लॉकडाऊन नको असेल तर आरोग्याची बंधनं पाळावीच लागतील. विमानतळांवर येणाऱ्या सर्व प्रवाशांकडे काटेकोर लक्ष देण्याचे निर्देशही ठाकरे यांनी प्रशासनाला दिले आहेत.

केंद्र सरकारकडून सर्व राज्यांना गाईडलाईन्स

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्र सरकारने काल कोरोनाव्हायरसच्या नवीन ओमिक्रॉन प्रकाराच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन बैठक बोलावली होती. आज, केंद्र सरकारच्या आरोग्य सचिवांनी सर्व राज्यांना नवीन गिल्डलाइन्स आणि आंतरराष्ट्रीय प्रवाशांबाबत घ्यावयाची खबरदारी असलेले पत्र जारी केले आहे. आंतरराष्ट्रीय प्रवाशांवर, विशेषतः ‘हाय रिस्क’ देशांतील प्रवाशांवर कठोर पाळत ठेवणे, नियमित तपासणी, कोविड चाचणी, त्यांच्या मागील प्रवासाच्या नोंदी आणि त्यांचे नमुने त्वरित जीनो सिक्वेन्सिंगसाठी पाठवणे, अशा सुचना सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना मुख्य सचिवांना दिल्या गेल्या आहेत.

राज्यांमध्ये RT-PCR चाचण्यांचे प्रमाण वाढवणे

पत्रात राज्यांना कोविड चाचणी पायाभूत सुविधा वाढवण्यासही सांगण्यात आले आहे. त्यामुळे नवीन कोविड विषाणूची कोणतीही लाट असल्यास, सुधारित चाचणी केंद्रे कार्यरत असावीत. काही राज्यांमध्ये RT-PCR चाचण्यांचे प्रमाण कमी झाल्याचे आढळून आले आहे. पुरेशी चाचणी नसल्यास, संसर्ग पसरण्याची खरी पातळी निश्चित करणे अत्यंत कठीण आहे. त्यामुळे, राज्यांनी चाचण्यांच्या पायाभूत सुविधा मजबूत करणे आणि मार्गदर्शक तत्त्वांची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे, अशा सुचना देण्यात आल्या आहेत.

दक्षिण आफ्रिकेत आढळला ‘ओमिक्रॉन’

चालू आठवड्यात दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. याबाबत, दक्षिण आफ्रिकेतील शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. ओमिक्रॉन वेरिएंट कुठे निर्माण झालाय, हे अद्याप स्पष्ट नाही. पण दक्षिण आफ्रिकेतील शास्त्रज्ञांनी या नवीन कोरोना वायरस वेरिएंटचा शोध लावला आहे. नंतर, हाँगकाँग आणि बोत्सवाना देशातल्या प्रवाशांमध्येही हा कोरोना व्हेरिएंट आढळला.

WHO काय म्हणतेय ?

WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे. या वेरिएंटची तीव्रता कळताच अनेक देशांनी हवाईसेवा निर्बंध लावण्यास सुरुवात केलीये, स्टॉक मार्केट कोसळले आहे आणि नेमका धोका शोधण्यासाठी शास्त्रज्ञ आपत्कालीन बैठका घेत आहेत. ओमिक्रॉनला डेल्टा वेरिएंटपेक्षा जास्त धोकादायक मानले जात आहे.