Jamkhed Ferfar Adalat News | फेरफार अदालतीतून मिळतोय शेतकऱ्यांना न्याय 

Jamkhed Ferfar Adalat News | जामखेड टाईम्स वृत्तसेवा | सत्तार शेख | शेतीसंबंधी प्रशासकीय प्रश्नांची सोडवणूक जलदगतीने व्हावी याकरिता महसुल विभागाकडून हाती घेण्यात आलेल्या फेरफार अदालत या उपक्रमातून गोरगरीब शेतकऱ्यांना न्याय मिळत असल्याचे चित्र आहे. यामुळे जामखेड तालुक्यातील शेतकरी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

मागील दोन महिन्यांत जामखेड तालुक्यात दोनदा पार पडलेल्या फेरफार अदालतीतून एकूण १८५ प्रकरणांचा निपटारा करण्यात प्रशासनाला यश आले आहे. प्रत्येक महिन्याच्या चौथ्या शुक्रवारी मंडळस्तरावर या फेरफार अदालतीचे आयोजन करण्यात येत आहे.

प्रत्येक महिन्याच्या चौथ्या शुक्रवारी फेरफार अदालत

जामखेड तालुक्यातील सर्वसामान्य शेतकरी आणि खातेदारांचे प्रलंबित राहिलेले फेरफार, वारस नोंदी , कलम१५५ प्रमाणे ७/१२ मधील दुरुस्ती वेळेवर पूर्ण व्हाव्यात यासाठी कर्जत जामखेड मतदारसंघात प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक महिन्याच्या चौथ्या शुक्रवारी प्रत्येक मंडळामध्ये फेरफार अदालत घेतली जात आहे. प्रत्येक महिन्याच्या चौथ्या शुक्रवारी ( त्या दिवशी सुट्टी असेल तर अगोदरच्या  शुक्रवारी ) प्रत्येक मंडळाच्या ठिकाणी फेरफार अदालत घेण्यात येत आहे.

जाहिरात

नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक

तलाठी आणि मंडळ अधिकारी यांच्याकडे प्रलंबित असणारे फेरफार निकाली काढण्याची कार्यवाही याद्वारे केली जाणार आहे. त्यासाठी प्रशासनाने प्रत्येक मंडळासाठी एका नोडल अधिकाऱ्याची नेमणूक केली आहे. त्यांनी फेरफार अदालत असेल त्या दिवशी संबंधीत फेरफार अदालतीचे योग्य नियोजन होते किंवा नाही याचे पर्यवेक्षण करून फेरफार अदालतीचा सविस्तर अहवाल सादर करावयाचा आहे.

ऑक्टोबर महिन्याच्या फेरफार अदालतीत काय घडलं ?

जामखेड तालुक्यात ऑक्टोबर महिन्यात पहिली फेरफार अदालत घेण्यात आली होती.या अदालतीत जामखेड मंडळामध्ये २७,अरणगाव मंडळात १४, नायगाव मंडळात १२, नान्नज मंडळात २१, खर्डा मंडळात २९ असे एकूण ९३ फेरफार मंजूर करण्यात आले.तसेच ७/१२ मधील झालेल्या चुका महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम १५५ नुसार एकूण १६ दुरुस्त करण्यात आल्या.

नोव्हेंबर महिन्याच्या फेरफार अदालतीत काय घडलं ?

नोव्हेंबर महिन्यामध्ये दिनांक २६/११/२०२१ रोजी दुसरी फेरफार अदालत घेण्यात आली यामध्ये जामखेड मंडळामध्ये १५,अरणगाव मंडळात ७, नायगाव मंडळात ११, नान्नज मंडळात १३, खर्डा मंडळात १६ असे एकूण ६२ फेरफार मंजूर करण्यात आले.तसेच ७/१२ मधील झालेल्या चुका महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम १५५ नुसार एकूण १४ नोंदी  दुरुस्त करण्यात आल्या.

दोन महिन्यात किती प्रकरणे निकाली ?

महसुल विभागाने जामखेड तालुक्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये घेतलेल्या दोन फेरफार अदालतीत एकूण १५५ फेरफार प्रकरणे मंजूर केली आहेत तर कलम १५५ नुसार एकूण ३० नोंदी दुरुस्त करण्यात आल्या आहेत.

तहसीलदारांचे अवाहन…

सदर फेरफार अदालतीस नागरिकांचा चांगला सहभाग मिळत आहे. फेरफार अदालतीच्या वेळी त्या मंडळातील सर्व तलाठी आणि मंडळ अधिकारी हे मंडळाच्या ठिकाणी उपस्थित राहत असल्याने  जामखेड तालुक्यातील सर्व शेतकरी आणि खातेदार यांनी याचा अजून मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा असे आवाहन जामखेडचे तहसीलदार योगेश चंद्रे यांनी केले आहे.