माझ्या मनात तुमच्याबद्दल आई वडिलांचे स्थान – आमदार रोहित पवार

जामखेड  टाईम्स वृत्तसेवा  : महासागराप्रमाणे खोली आणि हिमालयाप्रमाणे उंची असलेला आमचा आधारवड! आदरणीय शरद पवार साहेब तुम्हाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा! शतायुषी व्हा आणि माझ्यासारख्या युवांना आणि नव्या पिढीला कायम मार्गदर्शन करत रहा!,’ अशा शब्दांत रोहित यांनी पवारांना शुभेच्छा दिल्या आहेत.

रोहित पवार ( Rohit Pawar)  यांनी आजोबांबद्दलच्या आपल्या भावना एका पत्राद्वारे व्यक्त केल्या आहेत. हे पत्रही त्यांनी सोशल मीडियातून शेअर केलं आहे.’आदरणीय साहेब तुम्हाला काय भेट द्यावी, असा खूप विचार केला.पण काही सुचत नव्हतं. तुमची वाचनाची आवड पाहून एखादं पुस्तक भेट देण्याचा विचार केला, पण तुमचा व्यासंग पाहता ते तुम्ही आधीच वाचलेले असेल, अशी मला खात्री आहे, आणि तुम्ही स्वतः एक चालताबोलता संदर्भग्रंथ आहात, म्हणून पुस्तकाचा विचार मागे पडला आणि यंदाच्या दिवाळीत तुम्ही तुमच्या आईला म्हणजेच माझ्या पणजीला (कै. शारदाबाई पवार) यांना लिहिलेले पत्र अचानक आठवलं.

यातून तुमच्या जडणघडणीत आई वडिलांचे जे स्थान आहे, याबाबतच्या हृद्य भावना आमच्यापर्यंत पोहोचल्या. खरं तर तुमच्या बाबतीत माझ्या मनात तशाच भावना आहेत. या भावना मांडाव्यात असा विचार मनात आला आणि तुमच्याबद्दल नेहमीच एक आदरयुक्त भीती वाटत असल्याने माझ्या भावना पूर्णपणे व खुलेपणाने व्यक्त करता येणार नाहीत, म्हणून मी हे पत्र लिहितोय,’ असं रोहित पवार यांनी पत्रात म्हटलं आहे.

तसंच, या पत्रामध्ये त्यांनी आपल्या मनातील भावनांना ही वाट करून दिली असून शरद पवार यांच्या बाबतचे अनुभव सांगितले आहेत. राजकीय वर्तुळात या पत्राची जोरदार चर्चा आहे.