जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ पाचारणे यांचा आमदार रोहित पवारांवर हल्लाबोल, फुकटचे श्रेय घेण्याचा धंदा बंद करा म्हणत केली सडकुन टीका !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख। श्रेयवादाच्या लढाईबाबत आमदार रोहित पवार हे जनतेची दिशाभूल करण्यात कायम पटाईत आहेत. जनतेची दिशाभूल करणे, काहीही सबंध नसताना आयते श्रेय घ्यायचे हा त्यांचा उद्योग कायम चालु असतो. जवळा पाणीपुरवठा योजनेशी आमदार पवारांचा सुतरामही सबंध नाही. जी योजना गेल्या तीन आठवड्यात केलेल्या पाठपुराव्याचा परिपाक आहे. अशा योजनेचे श्रेय घेवून आमदार पवार जनतेला येडयात काढत आहेत. फुकटचे श्रेय घेण्याचा धंदा आमदार रोहित पवार यांनी बंद करावा असे म्हणत जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ पाचारणे यांनी आमदार रोहित पवारांवर थेट हल्ला चढवला.

Zilla Parishad member Somnath Pacharane attacked MLA Rohit Pawar, criticized him saying stop the business of taking credit for free

जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत जामखेड तालुक्यातील जवळा येथील १९ कोटी ६६ लाख रूपये खर्चाची  नळपाणीपुरवठा योजना खासदार डाॅ.सुजय विखे पाटील आणि आमदार प्रा राम शिंदे यांच्या शिफारशीने आणि पाठपुराव्यातून मंजूर झाली आहे.त्यामुळे इतरांनी फुकटचे श्रेय घेवु नये असा इशारा जिल्हा परिषद जवळा गटाचे सदस्य सोमनाथ पाचारणे यांनी दिला आहे.

याबाबत सोमनाथ पाचारणे यांनी प्रसिध्दीपत्रक काढून,या योजनेची माहिती दिली आहे.त्यात म्हटले आहे की,राज्यात भाजपा सरकार आल्यानंतर विविध विकास कामांना वेग आला आहे. त्याचाच भाग म्हणून जलजीवन मिशन योजनेंतर्गत जामखेड तालुक्यातील जवळा गावच्या नळपाणीपुरवठा योजनेचा आमदार प्रा राम शिंदे यांनी पाठपुरावा केला.

जवळा गावची नळपाणीपुरवठा योजना तीन आठवड्यापुर्वी जीवन प्राधिकरणाकडे वर्ग करण्यात आली.हे वास्तव आहे. त्यानंतर जीवन प्राधिकरण योजनेचे कार्यकारी अभियंता अजय मुळे, उपअभियंता ए.एस.अन्सारी व शाखा अभियंता आर. एस. थोरात यांनी तातडीने जवळा गावाला प्रत्यक्ष भेट देवून,नळपाणीपुरवठा योजनेचे नव्याने परिपुर्ण सुधारित अंदाजपत्रक तयार केले.

या अंदाजपत्रकास दि. ४ ऑक्टोबर २०२२ रोजी जीवन प्राधिकरण योजनेचे सदस्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील तांत्रिक छाननी समितीच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली. यानंतर दि.७ ऑक्टोबर २०२२ रोजी जीवन प्राधिकरण योजनेचे नाशिक प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंता यांनी तांत्रिक मान्यता दिली.

यानंतर आमदार प्रा राम शिंदे आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शिफारशीने हा प्रस्ताव राज्य सरकारच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाला सादर करण्यात आला. यावर तातडीने  १४ ऑक्टोबर २०२२ रोजी या योजनेला  प्रशासकीय मंजूरी देण्यात आली. हे या योजनेचे वास्तव आहे.

ज्या योजनेला गेल्या १५ दिवसात तांत्रिक आणि प्रशासकीय मंजूरी मिळाली आहे.त्या योजनेचा आमदार रोहित पवारांचा कसा सबंध येतो ? असा प्रश्र सोमनाथ पाचारणे यांनी विचारला आहे.

जवळा हे गाव आमदार प्रा राम शिंदे यांची कर्मभूमी आहे. यातून त्यांनी नळपाणीपुरवठा योजना मार्गी लावण्यासाठी शासन दरबारी सातत्याने प्रयत्न केले. सबंधीत अधिका-यांना वेळोवेळी सुचनाही केल्यामुळे साधारण २० कोटी रूपये खर्चाची योजना मंजूर होवू शकली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.