धक्कादायक : युट्यूबवरील व्हिडीओ पाहून तिने केली स्वता:चीच प्रसूती,नवजात बाळाला दुसऱ्या मजल्यावरून फेकले, पुण्यातील कोंडवे धावडे परिसरातील घटना

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : युट्यूबवरील व्हिडीओ पाहून एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीने स्वता: च स्वता:ची प्रसूती करण्याची धक्कादायक घटना पुण्यातून समोर आली आहे. प्रसूतीनंतर त्या मुलीने नवजात बाळाला दुसऱ्या मजल्यावरून टाकून दिल्याची धक्कादायक घटना उजेडात आली आहे.

Shocking, newborn baby thrown from second floor, incident in Pune's Kondve Dhavade area

पुण्यातील कोंडवे धावडे परिसरात राहणाऱ्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीने नवजात बालकास जन्म दिला आहे. त्यानंतर त्या बाळाला दुसऱ्या मजल्यावरून टाकून दिल्याची धक्कादायक घटना उजेडात आली आहे. या घटनेची राज्य महिला आयोगाने स्वाधिकारे गंभीर दखल घेतली आहे.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार जन्म दिलेले दोन दिवसीय नवजात अर्भक ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून बाळाच्या तब्येतीवर आयोग जातीने लक्ष देत आहे.

या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत तसेच सदर अल्पवयीन मुलगी गरोदर असताना ती तपासणीसाठी गेली असताना तिची माहिती डॉक्टरांनी संबंधित यंत्रणेला दिली आहे की नाही याची जबाबदारी निश्चित करून डॉक्टरांवरही कार्यवाही करण्याचे निर्देश पोलीस यंत्रणेला दिले आहेत असे चाकणकर म्हणाल्या

दरम्यान, नवजात बाळ सोसायटीच्या आवारात आढळून आल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. घटनास्थळी पोलिसांनी तातडीने धाव घेत बाळाला ताब्यात घेतले होते. त्यानंतर बाळाला उपचारासाठी ससून रुग्णालयातील दाखल करण्यात आले.दरम्यान पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार बाळाच्या आईचा शोध घेतला. तिच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

दरम्यान धक्कादायक बाब म्हणजे सदर प्रकरणातील अल्पवयीन मुलीने युट्यूबवरील व्हिडीओ पाहून स्वता:ची स्वता:च प्रसूती केली, त्यानंतर नवजात तिनेच इमारतीवरून खाली फेकून दिले होते अशी माहिती त्या मुलीने दिली असे वृत्त न्यूज 18 लोकमतने दिले आहे.

दरम्यान संबंधित मुलगी आणि तिची आई चार पाच महिन्यांपुर्वी एका खाजगी रुग्णालयात तपासणीसाठी गेले होते तेव्हा डाॅक्टरांनी मुलगी गरोदर असल्याची शक्यता वर्तवली होती. मात्र दोघींनी दुर्लक्ष केले अशीही माहिती समोर येत आहे. याप्रकरणी संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करण्याचे आदेश राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांनी दिले आहेत.