माझे कुटुंब माझी जबाबदारी बाकी सर्व गुवाहाटी, भाजपचे आमदार राम शिंदेंचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । अनैसर्गिक सरकार महाराष्ट्रावर आरूढ झालं, निसर्गाचा कोप झाला आणि दोन वर्षांत मुख्यमंत्र्याला पांडुरंगाच्या दर्शनाला जाताच आलं नाही, वारकरी सुध्दा गेले नाही, आता 10 तारखेला मोठी एकादशी आहे, सगळे वारकरी आणि दिंड्या पंढरीच्या दिशेने निघाल्या आहेत, ज्या दिवसापासून निघाल्या त्या दिवसापासून वेध लागलेत महाराष्ट्रातल्या सरकारला. काय परिस्थिती झालीये, माझं कुटुंब माझीच जबाबदारी आता फक्त तशीच परिस्थिती झालीये, मागचे सगळे सोडून गेलेत आणि माझं कुटुंब…माझी जबाबदारी.. बाकी सगळे गुवाहटी असे म्हणत राम शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार निशाणा साधला.

माजी मंत्री प्रा राम शिंदे यांची विधानपरिषदेवर आमदार म्हणून निवड झाल्याबद्दल भारतीय जनता पार्टीच्या अहमदनगर जिल्ह्यातील सर्व आघाड्यांच्या वतीने अहमदनगर येथील माऊली सभागृहात मंगळवार सायंकाळी भव्य सत्कार करण्यात आला. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात आमदार राम शिंदे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार राधाकृष्ण विखे पाटील हे होते.

यावेळी बोलताना राम शिंदे म्हणाले की, देशाच्या इतिहासात ज्या पक्षाचा मुख्यमंत्री त्या पक्षाचे मागचे गडी आख्खेच फुटून गेलेत, असं कधीच झालं नाही, मी पण इतिहास बघितला, वाचलाय, काय परिस्थिती निर्माण झालीये ज्या पक्षाचा मुख्यमंत्री त्या पक्षाच्या मंत्र्यांचे खाते मित्रपक्षांना देऊन टाकले, परिस्थिती गंभीर आहे असे म्हणत राम शिंदे यांनी शिवसेनेला लक्ष केले.

महाराष्ट्राच्या राजकारणातील आजची सर्वात मोठी बातमी : भाजपने केली बहुमत सिद्ध करण्याची मागणी

विधानपरिषदेला, राज्यसभेला विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी एकहाती केलेल्या सुक्ष्मनियोजनामुळे भाजपने महाविकास आघाडीला पराभवाची धूळ चारली, देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा नेता होणे नाही, राज्यातील परिस्थिती बदलली आहे. गेल्या अडीच वर्षात राज्यात अनैसर्गिक सरकार आल्यामुळे सामान्यांची कुचंबणा झाली. मागील पाच वर्षांत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना केलेलं काम जनता विसरलेली नाही असे शिंदे म्हणाले.

मुख्यमंत्र्यांसह शिवसेना नेत्यांवर गुन्हे दाखल करा : शिंदे गटाची मुंबई उच्च न्यायालयात याचिका

अगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सामोरे जायचं आहे. राज्यात आपलं सरकार पुन्हा सत्तेत येणार आहे. त्यामुळे अगामी निवडणूकीत संपूर्ण जिल्ह्यात भाजपला घवघवीत यश मिळवून देण्यासाठी जोमाने कामाला लागा बुथप्रमुख, पन्नाप्रमुख, शक्तिकेंद्र प्रमुख, गण प्रमुख, गट प्रमुख, या सर्वांनी मोठ्या हिमतीने काम करण्याची आवश्यकता आहे असे अवाहन आमदार राम शिंदे यांनी केले.

सांगलीच्या म्हैसाळ सामुहिक आत्महत्या प्रकरणात नवा खुलासा : गुप्तधनाच्या लालसेतून 9 जणांची हत्या, दोन भोंदूबाबांना अटक !

बोटावर मोजण्या इतकी माणसं आपल्या जिल्ह्यातून विधान परिषदेवर गेली, त्यात मलाही संधी मिळाली.संधी मिळताच पहिलाच फोन माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांना केला आणि त्यांना बोललो की, तुमचा ठराव कारणी लागला. जिल्ह्यातील तीन आमदारांत मी चौथा आमदार वाढलोय, सर्वांचं प्रेम, आपल्या सर्वांचा उत्साह पाहता नेतृत्वाने घेतलेला निर्णय हा येणाऱ्या कालखंडात उपयोगी आणायचायं असेही यावेळी राम शिंदे यांनी स्पष्ट केले.