जामखेड: लग्न सोहळ्यातून दीड लाखाचा कॅमेरा चोरीला, आदित्य गार्डन येथील घटना, अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : शहरातील आदित्य गार्डन येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.लग्न सोहळ्यातून दीड लाखाच्या कॅमेर्याची चोरी झाल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जामखेड शहरातील आदित्य गार्डन येथे ३० रोजी जाधव व भोरजे हा विवाह सोहळा होता. या सोहळ्याचे छायाचित्रण करण्याचे काम जामखेडच्या पोकळे वस्ती येथील अस्लम सुलतान शेख (वय २५) या फोटोग्राफर मिळाले होते. त्या नुसार शेख यांनी दिवसभर फोटोग्राफीचे काम केले.
सायंकाळी सुमारे ५ वाजता वधू निरोप समारंभानंतर त्यांनी आपला सोनी अल्फा मार्क फोर कॅमेरा, सिगमा ८५ एमएम लेन्स, २८-७० सोनी लेन्स, चार्जर व मेमरी असलेली बॅग आदित्य गार्डनच्या स्टेजवर ठेवली होती. यानंतर काही वेळाने बॅग घेण्यासाठी गेले असता ती जागेवर आढळून आली नाही.
आजूबाजूच्या लोकांकडे चौकशी केली असता कोणालाही याबाबत माहिती नसल्याने अज्ञात चोरट्याने बॅग चोरून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. चोरीस साहित्याची एकूण किंमत सुमारे १ लाख ५० हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून जामखेड पोलीस पुढील तपास करत आहेत.
लग्न समारंभात चोरी घटना सातत्याने घडतात. मंगल कार्यालयात सीसीटिव्ही नसल्याने चोरांचे चांगलेच फावत आहे. प्रशासनाने या चोऱ्यांना आळा घालण्यासाठी तातडीने सर्व मंगल कार्यालयांचा सुरक्षा आढावा घेण्याची आवश्यकता आहे.