जामखेडमध्ये स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई! हद्दपार केलेले दोन सराईत गुन्हेगार एलसीबीच्या जाळ्यात.​

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जिल्हाबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करून जामखेड शहरात खुलेआमपणे वावरणाऱ्या दोघा गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या. या गुन्हेगारांनी जिल्हाबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही मोठी कारवाई ६ रोजी जामखेड शहरात करण्यात आली.

Major action by the Local Crime Branch in Jamkhed! Two exiled innkeepers caught in the net of the LCB

जामखेड शहरातील आरोळेवस्ती भागातील सोनु वाघमारे आणि विक्रम डाडर या दोघांना जामखेडमधून अटक करण्यात आली आहे. जिल्हाबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करून हे दोघेही शहरात खुलेआम वावरत होते.
अहिल्यानगर जिल्ह्यातून हद्दपार केलेल्या दोन सराईत गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेने जामखेड शहरातील एका शेतातून ताब्यात घेतले.

पोलिसांनी या दोघांच्या रेकॉर्डची तपासणी केली असता, त्यांना १३ फेब्रुवारी २०२५ पासून एका वर्षासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले असल्याचे समोर आले. जिल्हाबंदी आदेशाचा भंग केल्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल सुनील रमेश मालणकर यांच्या फिर्यादीवरून जामखेड पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२ नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये हद्दपार केलेले इसम विनापरवाना वास्तव्य करत असल्याचे दिसून आल्यास, नागरिकांनी तात्काळ स्थानिक गुन्हे शाखेच्या ०२४१-२४१६१११ या क्रमांकावर किंवा डायल ११२ वर संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी केले आहे.