महाराष्ट्राच्या राजकारणातील आजची सर्वात मोठी बातमी : भाजपने केली बहुमत सिद्ध करण्याची मागणी

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी आज सायंकाळची समोर आली आहे. महाराष्ट्रात सुरु असलेल्या सत्तासंघर्षात भाजपची एन्ट्री झाली आहे. राज्यपालांनी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावून ठाकरे सरकारला बहुमत सिध्द करण्यास सांगावे असे पत्र राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना दिले आहे.

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या शिष्टमंडळाने राजभवनात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची आज रात्री भेट घेतली. या भेटीत त्यांनी राज्यपालांना एक पत्र दिले.आम्ही तत्काळ फ्लोअर टेस्टची मागणी करणारे पत्र महाराष्ट्राच्या राज्यपालांना दिले आहे असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

शिवसेनेचे 39 आमदार सांगत आहेत की त्यांना राष्ट्रवादी, काँग्रेस सरकारसोबत राहायचे नाही; महाविकास आघाडी सरकारने बहुमत गमावले आहे. आम्ही मुख्यमंत्र्यांना तत्काळ फ्लोर टेस्टद्वारे बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश द्यावेत अशी विनंती राज्यपालांना केली आहे असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

शिवसेनेत निर्माण झालेल्या बंडाळीत भाजपचा हात नसून तो शिवसेनेचा अंअंतर्गत प्रश्न असल्याचे मागील आठवडाभरापासून भाजपकडून सातत्याने सांगितले जात होते. राज्यात निर्माण झालेल्या सत्तासंघर्षात भाजपने आज अधिकृत उडी घेतली. भाजपने राज्यपालांकडे महाविकास आघाडी सरकारला बहुमत सिध्द करण्यास पाचारण करावे असे पत्र आज रात्री देण्यात आले.

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या मागणीवर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिध्द करण्यासाठी कधी पाचारण करतात याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.