जामखेड टाइम्स वृत्तसेवा : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषी महाविद्यालय (हाळगाव, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर) येथे नियमित पाणीपुरवठा उपलब्ध व्हावा, यासाठी करमाळा तालुक्यातील मांगी मध्यम प्रकल्पातून उपसा जलसिंचन योजनेद्वारे पाणी देण्याचा २६.९१ कोटी रुपयांचा प्रस्ताव तातडीने शासनाकडे सादर करावा, असे निर्देश महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिले आहेत. (Ram Shinde News)

मुंबई येथील विधान भवनात आयोजित एका उच्चस्तरीय बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे, कृषी सचिव परिमल सिंह आणि दूरदृष्यप्रणालीद्वारे अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया उपस्थित होते.
महाविद्यालयातील अंतर्गत रस्ते, विश्रामगृहाचे नूतनीकरण, खेळाचे मैदान आणि सर्व पायाभूत सुविधांची कामे तातडीने मार्गी लावण्यासाठी कृषी विभागाने पुढाकार घेऊन इतर विभागांशी समन्वय राखावा, अशी सूचनाही यावेळी करण्यात आली.
२० किमीवरून आणणार पाणी; विविध विकासकामांवर चर्चा
हाळगाव येथील कृषी महाविद्यालयापासून मांगी मध्यम प्रकल्प साधारण २० किलोमीटर अंतरावर आहे. या धरणातून उपसा जलसिंचन योजना राबवून महाविद्यालयाला नियमित पाणी देणे, विविध शेड्स उभारणे, पाईपलाईन व कुंपणाचे काम करणे, तसेच गोदाम, रस्ते आणि मैदानाची उभारणी करणे यासंदर्भात बैठकीत सविस्तर चर्चा झाली.
८ वर्षांनंतरही कामे अपूर्ण, समन्वय राखण्याचे आदेश
कृषी महाविद्यालय सुरू होऊन आठ वर्षे झाली आहेत, मात्र भूसंपादन प्रक्रिया आणि अन्य अनेक महत्त्वाची कामे अद्याप अपूर्ण अवस्थेत आहेत. ही कामे तातडीने पूर्ण व्हावीत या दृष्टीने कृषी, सार्वजनिक बांधकाम, महसूल आणि जलसंपदा इत्यादी विभागांनी परस्परांशी समन्वय राखावा आणि यात कृषी विभागाने मुख्य पुढाकार घ्यावा, असे निर्देश सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिले.
प्रस्ताव पाठवा, विनाविलंब मान्यता देऊ: कृषीमंत्री दत्तात्रय भरणे
बैठकीत बोलताना कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट केले की, या महाविद्यालयाशी संबंधित असणारे सर्व आवश्यक प्रस्ताव संबंधित विभागांनी तातडीने सादर करावेत. शासन स्तरावरून या सर्व प्रस्तावांना कोणतीही दिरंगाई न करता बिनाविलंब मान्यता देण्याची कार्यवाही तात्काळ केली जाईल.