कर्जत तालुक्यातील अनेक गावांमध्ये आमदार राम शिंदे यांचे जंगी स्वागत

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : आमदार राम शिंदे यांचा विधान परिषदेवर दणदणीत विजय मिळाल्यानंतर आज प्रथमच राम शिंदे यांचे कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात आगमन झाले.

आज सकाळी आठ वाजता श्री क्षेत्र सिद्धटेक येथील सिद्धिविनायकाचे दर्शन आणि आरती करून आमदार राम शिंदे यांनी आपल्या दौऱ्याचा आरंभ केला. राम शिंदे यांचे सिद्धटेक येथे आगमन होताच सिद्धटेक ग्रामस्थ आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात शिंदे यांचे स्वागत केले.

फटाक्यांची आतिषबाजी आणि ढोल ताशांच्या गजरात  शिंदे यांचा विजय उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी ग्रामस्थांनी कार्यकर्त्यांनी राम शिंदे यांच्या विजयाबद्दल त्यांचा नागरी सत्कार केला.

सिद्धटेक येथील राम शिंदे यांचे भांबोरा त्यानंतर आता राशीन या ठिकाणी आगमन झाले आहे. जगदंबा देवीचे दर्शन आणि आरती करून राम शिंदे यांची भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली आहे. या मिरवणुकीत नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.

राशीन येथील भाजपच्या कार्यकर्त्यांकडून आमदार राम शिंदे यांचा भव्य असा हार घालून नागरी सत्कार करण्यात आला, त्याच बरोबर फुलांच्या आणि गुलालाची आतषबाजी करत विजयोत्सव साजरा करण्यात आला.