जामखेड : चिठ्ठीचा कौल – ये उपरवाले का इशारा है… आनेवाला वक्त हमारा है… जामखेड बाजार समिती निवडणूक निकालाच्या संदेशाने भाजपात संचारला उत्साह !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । संपुर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या जामखेड बाजार समितीवर आमदार प्रा.राम शिंदे यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पार्टीने कब्जा मिळवला.ईश्वरीय चिठ्ठीवर भाजपचे सभापतीपदाचे उमेदवार शरद कार्ले हे विजयी झाले.आमदार प्रा राम शिंदे यांनी आखलेली रणनिती जामखेड बाजार समिती निवडणुकीत यशस्वी ठरली. कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी आमदार राम शिंदे यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती.त्याला मोठे यश मिळाले.आमदार प्रा.राम शिंदे यांची राजकीय ताकद वाढू लागल्याचे या निवडणुकीच्या माध्यमांतून स्पष्ट झाले आहे. ये उपरवाले का इशारा है.. आनेवाला वक्त हमारा है असाच संदेश जामखेड बाजार समितीच्या निवडणुकीने भाजपा कार्यकर्त्यांना दिला आहे. यामुळे जामखेड भाजपमध्ये उत्साह संचारला आहे.
जामखेड बाजार समितीच्या इतिहासात यंदा पार पडलेली निवडणूक ऐतिहासिक ठरली.या निवडणुकीत पहिल्यांदाच अतिशय चुरशीचा सामना पाहायला मिळाला.या निवडणुकीत गावागावातील कार्यकर्ते आपल्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी मोठी मेहनत घेत असल्याचे दिसले. या निवडणुकीत आमदार प्रा.राम शिंदे विरूध्द आमदार रोहित पवार असा थेट सामना होणार असा कयास होता.पण जागा वाटपात आमदार रोहित पवारांनी राष्ट्रवादीत असलेल्या राळेभात बंधूंसमोर शरणागती पत्कारत अवघ्या चार जागांवर आपले उमेदवार उभे केले. या चारही जागांवर त्यांच्या उमेदवारांना दारूण पराभवाचा सामना करावा लागला. गाव कारभाऱ्यांनी रोहित पवारांना नाकारत आमदार प्रा.राम शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला. यातून जामखेड तालुक्याची राजकीय हवा बदलल्याचे स्पष्ट झाले.
जामखेड बाजार समिती निवडणुकीत राष्ट्रवादीतील राळेभात बंधूंना विखे पिता पुत्रांची साथ असल्याचे बोलले जात होते. निवडणूक संपेपर्यंत ही बाब अधोरेखित झाली.आमदार रोहित पवार व विखेंची छुपी युती या निवडणुकीतून जगजाहीर झाली, पण या युतीवर आमदार प्रा राम शिंदे यांनी आखलेली रणनिती ‘भारी’ ठरली.आमदार प्रा.राम शिंदे हेच ‘किंग’ असल्याचे या निवडणुकीने सिध्द केले.
आमदार प्रा.राम शिंदे यांनी भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष असलेल्या शरद कार्ले या निष्ठावंत तरूण कार्यकर्त्याला जामखेड बाजार समितीचा सभापती करत तालुक्यातील तरूणाईला आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. शरद कार्ले हे तरूण तडफदार कार्यकर्ते आहेत. कार्ले यांना दिलेला न्याय तालुक्यातील तरूण कार्यकर्त्यांसाठी अश्वासक ठरला आहे.भाजपात निष्ठेने काम केल्यास नेतृत्वाकडून मोठी संधी दिली जाते, हाच संदेश तालुक्यातील तरूणांमध्ये गेला आहे. यामुळे अगामी काळात तालुक्यातील तरूण भाजपाच्या गोटात मोठ्या प्रमाणात दाखल होऊ शकतात, असा अंदाज राजकीय जाणकारांकडून व्यक्त केला जात आहे.
2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर कर्जत-जामखेड मतदारसंघाचे राजकीय चित्र बदलले. भाजपातून आऊट गोईंग झाले. त्यातच कर्जत नगरपंचायत निवडणुकीत आमदार रोहित पवार यांनी दडपशाही आणि दबावाच्या राजकारणाचा नवा पॅटर्न जन्माला घातला. राष्ट्रवादीची मतदारसंघात प्रचंड हवा असल्याचा अभास निर्माण करत भाजपला कमजोर करण्याचे प्रयत्न झाले. पण महाविकास आघाडी सरकार कोसळत असतानाच विधानपरिषदेच्या निवडणुकीत प्रा राम शिंदे हे पुन्हा आमदार झाले. शिवाय राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आले.
प्रा राम शिंदे हे पुन्हा आमदार झाल्यानंतर मतदारसंघाची राजकीय हवा बदलण्यास सुरुवात झाली. आमदार शिंदे यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघाची पुन्हा बांधणी हाती घेतली. यातून मग इनकमिंग मोहिम गतिमान झाली. मतदारसंघासाठी कोट्यावधीचा निधी मंजुर करून आणला जाऊ लागला.भाजपात सक्रीय नसलेले अनेक जण पुन्हा जोमाने पक्षकार्यात सक्रीय झाले.आमदार प्रा.राम शिंदे यांनी विधानपरिषदेचे आमदार झाल्यानंतर आखलेल्या प्रत्येक व्यूहरचनेला यश मिळू लागले. यातूनच मतदारसंघातील भाजपात नवचैतन्य आले.
जामखेड बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील व खासदार डॉ.सुजय विखे-पाटील हे दोघे पिता पुत्र भाजपच्या पॅनलला साथ देतील अशी अपेक्षा होती. परंतू विखे यांच्या जामखेड कार्यालयाचे पीए तसेच त्यांचे बंधू आणि विखे यांच्या आणखीन एका कार्यकर्त्याने राष्ट्रवादीच्या पॅनलकडून उमेदवारी केली. ते निवडून आले. सभापती – उपसभापती पदाच्या निवडणुकीत विखे समर्थक कैलास वराट आणि अंकुश ढवळे हे दोन्ही संचालक भाजपला साथ देतील अशी अपेक्षा होती, पण त्यांनी राष्ट्रवादीतील राळेभात गटासोबत राहण्याचा निर्णय घेतला. यातून विखे आणि आमदार रोहित पवार यांची युती जगजाहीर झाली.
विखे पिता पुत्रांच्या या निर्णयामुळे दुखावलेल्या आमदार राम शिंदे यांनी त्यांच्याविरोधात जोरदार टीकास्त्र सोडत पक्ष नेतृत्व आणि पक्षाकडे विखेंच्या कारनाम्यांची तक्रार करणार असल्याचे माध्यमांशी बोलताना जाहीर केले. विखे ज्या पक्षात जातात त्या पक्षाविरोधात काम करतात हे मी ऐकुन होतो, त्याची आज मला प्रचिती आली असेही शिंदेंनी स्पष्ट केले.मी पक्षाच्या कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी, पक्षसंघटन मजबुत करण्यासाठी मेहनत घेत असताना विखे पिता पुत्र पक्षविरोधी भूमिका घेत होते, असा पक्षाला संदेश देण्यात आमदार प्रा.राम शिंदे यानिमित्ताने यशस्वी ठरले आहेत.
दरम्यान, 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर कर्जत-जामखेड मतदारसंघात अनेक राजकीय घडामोडी घडल्या. प्रा राम शिंदे हे विधानपरिषदेचे आमदार झाल्यानंतर त्यांनी मतदारसंघात जोरदार बांधणी हाती घेतली. ग्रामपंचायत निवडणुकीत पक्षाच्या कार्यकर्त्यांना ताकद देत सर्वाधिक ग्रामपंचायती निवडून आणल्या. त्यानंतर जामखेड बाजार समिती निवडणुकीत कार्यकर्त्यांना राजकीय ताकद देत ही निवडणूक स्वबळावर लढवली.त्यात बाजी मारली. सभापतीपद भाजपकडे खेचून आणले. एकुणच जामखेड तालुक्यात घडत असलेल्या राजकीय घडामोडींनुसार ये उपरवाले का इशारा है.. आनेवाला वक्त तुम्हारा है… असाच संदेश भाजपात गेला आहे.यामुळे जामखेड भाजपात उत्साह संचारला आहे. भाजपाची अर्थात आमदार प्रा.राम शिंदे यांची राजकीय ताकद पुन्हा वाढू लागली आहे. हेच जामखेड बाजार समिती निकालावरून स्पष्ट होत आहे.