जामखेड : विरोधकांची राजकीय कारकिर्द सूरू होण्यापुर्वीच 548 D या राष्ट्रीय महामार्गाची मुहर्तमेढ, भाजपा तालुकाध्यक्ष अजय काशिद यांचा आमदार रोहित पवारांवर जोरदार हल्लाबोल

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । आमदार रोहित पवार यांची राजकीय कारकिर्द सुरु होण्यापुर्वीच कर्जत जामखेडचे भाग्यविधाते आमदार प्रा.राम शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548 D या राष्ट्रीय महामार्गाची मुहर्तमेढ रोवली गेली होती, परंतू आमदार रोहित पवारांकडून सोशल मिडीयावर व्हिडीओ टाकून सदर राष्ट्रीय महामार्गाचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरु आहे. विरोधकांचा हा प्रयत्न अतिशय लाजिरवाणा आहे, असा जोरदार हल्लाबोल भाजपचे तालुकाध्यक्ष ॲड अजय काशीद यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केला आहे.

Even before political career of rohit pawar started Muhartamedha of National Highway 548 D, BJP jamkhed taluka president Ajay Kashid strongly attacked MLA Rohit Pawar,

भाजपा तालुकाध्यक्ष ॲड अजय काशीद यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, कर्जत जामखेड मतदारसंघ पुण्या – मुंबईशी जलद गतीने जोडला जावा यासाठी कर्जत-जामखेड मतदारसंघातून राष्ट्रीय महामार्ग व्हावेत यासाठी आमदार प्रा राम शिंदे यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. पाठपुरावा करत असताना आमदार प्रा राम शिंदे हे प्रत्येक जाहीर सभांमधुन कर्जत जामखेड तालुके पुणे मुंबईशी राष्ट्रीय महामार्गाच्या माध्यमांतून जोडले जाणार असल्याचे सांगत होते. 2014 मध्ये फडणवीस सरकारमध्ये मंत्री झाल्यानंतर आमदार प्रा राम शिंदे यांनी तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमांतून केंद्रिय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.

आमदार प्रा राम शिंदे यांनी हाती घेतलेल्या पाठपुराव्यामुळे राष्ट्रीय महामार्ग विभागामार्फत 2015 आणि 2016 या दोन वर्षात कर्जत जामखेड मतदारसंघात प्राथमिक स्तरावर सर्व्हे  करण्यात आला होता. त्यामुळे तळेगाव दाभाडे – चाकण – शिक्रापुर – न्हावरा फाटा – श्रीगोंदा- जामखेड – पाटोदा – अहमदपुर या मार्गाला 3  जानेवारी 2017 रोजी राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाला होता. त्यानंतर सन 2017-18 आणि 2018-19 या वर्षांत या महामार्गाचे सर्व्हेक्षण, लगतच्या जमिनीचे भूसंपादन व सविस्तर प्रकल्प अहवाल करण्याचे काम हाती घेण्यात आले होते.

दरम्यान 3 जानेवारी 2017 ही अशी तारीख आहे की, या तारखेला आमदार रोहित पवार यांच्या राजकीय कारकिर्दीला प्रारंभ झालेला नव्हता. वास्तविक पाहता आमदार रोहित पवारांची राजकीय कारकिर्द मार्च 2017 मध्ये जिल्हा परिषद सदस्य म्हणून अस्तित्वात आली. ही वस्तूस्थिती आहे. सन 2014 पासून आमदार प्रा राम शिंदे यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून 3 जानेवारी 2017 रोजी तळेगाव दाभाडे – चाकण – शिक्रापुर – न्हावरा फाटा – श्रीगोंदा- जामखेड – पाटोदा – अहमदपुर या मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळवला होता, ज्या कामाचा काडीमात्र सबंध नाही. अशा कामाचेही श्रेय घेण्याचा आमदार रोहित पवार सुरु असलेला प्रयत्न लाजीरवाणा आहे. त्यांच्याकडून असा पोरकटपणा कायम केला जातो. गेल्या अडीच तीन वर्षांपासून मतदारसंघातील जनता हे सर्व पाहत आहे.

मंत्री आणि नेत्यांबरोबर फोटो काढायचे, व्हिडीओ काढायचे, स्वता:च्याच आजोबांकडून स्वता:चेच कौतुक करून घ्यायचे आणि मी कसा पाठपुरावा केला हे सोशल मिडीयामधून दाखवायची पध्दत कर्जत जामखेड मतदारसंघातील जनतेच्या लक्षात आली आहे. जे काम विरोधकांनी केलेच नाही अशा कामाचेही श्रेय घेण्याचा त्यांचा जो केविलवाणा प्रयत्न सुरु आहे तो हास्यास्पद असून, जनतेची दिशाभूल करणारा आहे. विरोधकांकडून गेल्या अडीच तीन वर्षांपासून अभासी विकासाचे चित्र निर्माण करण्यात आले आहे. विरोधकांचा हा प्रयत्न जनतेच्या आता लक्षात आला आहे, असा हल्लाबोल यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष अजय काशीद यांनी केला आहे.

जामखेड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे काम जामखेड शहरातून सुरु झाले आहे. या कामासाठी आमदार प्रा.राम शिंदे हे 2009 पासून पाठपुरावा करत आहेत. 2019 नंतर सदर राष्ट्रीय महामार्गाचे काम मार्गी लागावे यासाठी आमदार प्रा राम शिंदे यांच्याबरोबर खासदार डॉ.सुजय विखे-पाटील यांनीही जोरदार पाठपुरावा केला होता. त्यामुळे कर्जत-जामखेड मतदारसंघात राष्ट्रीय महामार्गाचे काम प्रगतीपथावर आले आहे.

केंद्रात भाजपची सत्ता आहे. कर्जत-जामखेड हा भाजपचा बालेकिल्ला आहे, म्हणूनच केंद्र सरकारकडून मतदारसंघात राष्ट्रीय महामार्गाचे काम वेगाने हाती घेण्यात आले. सदर राष्ट्रीय महामार्गाचे श्रेय मोदी सरकार आणि आमदार प्रा.राम शिंदे, खासदार डॉ.सुजय विखे-पाटील यांचे आहे, असे ठणकावून सांगत काशिद पुढे म्हणाले की, विरोधकांनी मोदी सरकारचे श्रेय घेण्याचा जो केविलवाणा प्रयत्न सुरु केला आहे त्यातून विरोधकांच्या प्रवृत्तीचे दर्शन होते, असा जोरदार टोला त्यांनी लगावला.