जामखेड : वादग्रस्त कंत्राटी कर्मचारी शाम जाधवरच्या गैरव्यवहाराची चौकशी करा  – रूग्ण कल्याण समितीचे सदस्य रमेश आजबे यांची मागणी

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । जामखेड ग्रामीण रुग्णालयात गेल्या 15 वर्षांपासून ठाण मांडून बसलेल्या वादग्रस्त कंत्राटी कर्मचारी शाम जाधवर विरोधात सर्व कर्मचारी आक्रमक झाल्यानंतर आता रूग्ण कल्याणी समितीचे सदस्य रमेश दादा आजबे हेही आक्रमक झाले आहेत. वादग्रस्त कर्मचारी जाधवर याच्या गैरव्यवहाराची चौकशी करून त्यांची कर्जत-जामखेड मतदारसंघाबाहेर बदली करावी अशी लेखी मागणी रमेश दादा आजबे यांनी अहमदनगर जिल्हा शल्य चिकित्सक यांना पाठवलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

Probe into controversial contract employee Sham Jadhawar's malfeasance - demands Ramesh Ajbe, member of the Patient Welfare Committee

रूग्ण कल्याण समितीचे सदस्य रमेश दादा आजबे यांनी जिल्हा शल्य चिकित्सक यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शाम वसंतराव जाधवर प्रयोगशाळा तंत्रज्ञ (आय.सी.टी.सी.) हा कंत्राटी कर्मचारी गेल्या पंधरा वर्षापासून ग्रामीण रुग्णालय जामखेड येथे कार्यरत आहे. त्याच्याविरोधात सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्रित येत तक्रार केल्यानंतर त्याची कर्जतला तात्पुरती बदली करण्यात आली आहे. जाधवर याच्याविरोधात तक्रारी प्राप्त होताच जिल्हा शल्यचिकित्सकांनी तीन सदस्यीय चौकशी समिती नेमली. काही दिवसांपुर्वी या समितीने जामखेडला भेट देऊन तक्रार कर्मचाऱ्यांच्या लेखी जबाब नोंदवून घेतले. चौकशी समिती जाधवर याला पाठीशी घालण्यासाठी चौकशी करताना दिसली होती.

कंत्राटी कर्मचारी शाम जाधवर यांच्याविरोधात गैरव्यवहाराचे अनेक आरोप करण्यात आले आहेत तसेच रूग्णालयातील सर्वच कर्मचाऱ्यांनी मागील पंधरा दिवसांपुर्वी जाधवर विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला लेखी तक्रार दाखल केली आहे.इतरही अनेक गैरव्यवहाराचे आरोप त्याच्यावर आहेत. जाधवर याने लसीकरणामध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार केलेला आहे. दवाखान्यातील अनेक वस्तू परस्पर खाजगी बाजारात विकल्या आहेत. तसेच महिला कर्मचाऱ्यांशी असभ्य वर्तन इतरांना पिस्तूलचा धाक दाखवून दहशत निर्माण करणे अशा तक्रारीची जिल्हा शल्य चिकित्सक यांनी चौकशी करावी म्हणून रूग्ण कल्याण समितीचे सदस्य रमेश (दादा) आजबे आक्रमक झाले आहेत.

जामखेड ग्रामीण रुग्णालयातील कंत्राटी कर्मचारी शाम जाधवर विरोधात तक्रारी प्राप्त झाल्यानंतर त्याची कर्जतला तात्पुरती बदली करण्यात आली खरी पण जाधवर हा जामखेडमध्येच असतो. ग्रामीण रुग्णालयातील एका काँर्टरमध्ये त्याचा पसारा आहे. तो रात्री अपरात्री दारू पिऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करतो.पोलीस डिपार्टमेंट, चौकशी समीतीत माझे पाहुणे आहेत माझे कोणीही काहीही करू शकत नाही म्हणून इतर कर्मचाऱ्यांमध्ये दहशत निर्माण करतो अशी अनेकांनी तक्रार केली आहे. या सर्व बाबींची सविस्तर चौकशी करावी व दवाखान्यातील औषधे, इंजेक्शन, फँन, वायर, बॅटरी कोणी कधी विकले याचा मागील चार वर्षातील हिशोब तपासावा अशी मागणी कर्मचारी वर्गातून होत आहे, असेही आजबे यांनी पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे.

अहमदनगरचे जिल्हा शल्य चिकित्सक यांना सामाजिक कार्यकर्ते व रूग्ण कल्याण समितीचे सदस्य रमेश आजबे यांनी सविस्तर निवेदन पाठवले आहे, त्यात म्हटले आहे की, शाम जाधवर हे ग्रामीण रुग्णालयाच्या प्रत्येक विभागामध्ये हस्तक्षेप करतात. त्यांनी आतापर्यंत अनेक घोटाळे केलेले आहेत.याचा तपशीलच आजबे यांनी जिल्हा शल्यचिकित्सक यांना पाठवला आहे.

1.लसीकरण घोटाळा – जिल्हा परिषद वरुन लस आणणे व दवाखान्यात आणून 1000 रुपयांना विकणे, लसीचे टोकन 1000 रुपयाला विकणे, ऑनलाइन करण्यासाठी पैसे घेणे, यामध्ये लाखो रूपयांचा घोटाळा करण्यात आला आहे.

2. दवाखान्यातील वस्तु चोरणे –  रुग्णालयातील औषधे, सलाईन, साप चावल्याची लस injection डिलिव्हरी संदर्भातील औषधे, एचआयव्ही किट, पीपीई किट, कॉट, गाद्या, बेडशीट इ. अनेक वस्तु चोरून खाजगी होस्पिटलला विकल्या आहेत.

3. प्रमाणपत्र देणे – रुग्णालयात मृत्यू दाखले, जन्म दाखले, फिटनेस प्रमाणपत्र संदर्भ चिठ्ठी शिक्षक पोलिस यांना मेडिकल बिल काढण्यासाठी देणे, कोविड काळात मृत्यू झालेले दाखले खोट्या सह्या करून देणे.

4. नर्सिंग सिस्टर बद्दल – रुग्णालयाचा कणा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिस्टर यांना रुग्णसेवेत अडथळा करणे, त्यांना घाणेरडे व अर्वाच्च शब्दांत बोलणे, विनाकारण त्रास देणे, शिव्या देणे, दारू पिऊन धिंगाणा करणे, रात्रीच्या वेळी हॉस्पिटलमध्ये पार्टी करणे,दारू पिणे, आणी इतर स्टाफला त्रास देणे.आशा वर्कर यांना घाण बोलणे यामुळे हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरी पेशंट येणे बंद झाले आहेत.

तसेच खाजगी हॉस्पिटलमध्ये सोनोग्राफी सेंटरमध्ये तपासणीसाठी जाऊन cs यांच्या नावाखाली पैसे घेतो. पैसे न दिल्यास सोनोग्राफी सेंटर बंद करण्याची धमकी देतो.  येथे गर्भाची तपासणी करतात म्हणून पेपरला बातमी देतो म्हणून धमकावतो. यामुळे खाजगी दवाखान्यातील डॉक्टर सुद्धा जाधवरच्या कारनाम्याने परेशान झाले आहेत.

शाम जाधवर हा कंत्राटी कर्मचारी मागील पंधरा वर्षापासून जामखेड ग्रामीण रुग्णालय येथे कार्यरत असल्यामुळे त्याला हॉस्पिटल मधील कोपरा न कोपरा माहीत आहे. त्यामुळे तो रुग्णालयातील सर्व कामांमध्ये हस्तक्षेप करतो तसेच आर्थिक बाबींमध्ये हस्तक्षेप करतो. दवाखान्यातील कोणतेही अवैध काम करायचे झाल्यास त्याचे नाव प्रसिद्ध आहे. जाधवर हा खूप मोठा डॉक्टर आहे असा भास येथील जनतेला झाला आहे.हा दवाखाना माझाच आहे, मी इथला बॉस आहे, मी मुंडेंच्या गावचाआहे, माझे पाहूणे मोठ मोठे आहेत, सिव्हिल सर्जन सोबत माझी सेटलमेंट आहे. माझे कोणी काहीही वाकडे करू शकत नाही. असे स्टाफ व आलेल्या लोकांना तो नेहमी धमकावतो.

जामखेड ग्रामीण रुग्णालय येथे आलेल्या रुग्णांना जाधवर हा खाजगी हॉस्पिटलमध्ये पाठवतो व संबंधित हॉस्पिटलकडून पैसे घेतो. शिक्षक, पोलीस यांचे मेडिकल बील काढण्यासाठी पैसे घेणे अशा अनेक तक्रारी आहेत. खाजगी दवाखान्यातील रुग्णांचे लॅब रिपोर्ट सरकारी दवाखान्यात करतो व पैसे घेतो, असा गंभीर आरोप आजबे यांनी केला आहे.

शाम जाधवर याच्यामुळे सर्वसामान्य रुग्णांना व्यवस्थित उपचार मिळत नाहीत, तसेच जामखेड ग्रामीण रुग्णालयाचे नाव खराब होत आहे. त्याची आता बदली झालेली असतानाही ते रात्री अपरात्री दवाखाना परिसरात येतात. दोन दिवसांपूर्वी ग्रामीण रुग्णालयावर दगडफेक झाली यातही कोणाचा हात आहे हे प्रशासनाने तपासावे अशी मागणी रूग्ण कल्याण समितीचे सदस्य रमेश दादा आजबे यांनी केली आहे.

जामखेड ग्रामीण रुग्णालयातील वादग्रस्त कंत्राटी कर्मचारी शाम जाधवर याची जामखेड आणि कर्जत या दोन्ही तालुक्याच्या बाहेर बदली करण्यात यावी अशी मागणी रूग्ण कल्याण समितीचे सदस्य रमेश दादा आजबे यांनी केली. याबाबतचे निवेदन त्यांनी प्रकल्प संचालक एड्स नियंत्रण संस्था, वडाळा मुंबई, उपसंचालक आरोग्य सेवा नाशिक विभाग नाशिक, अहमदनगर जिल्हा शल्यचिकित्सक, वैद्यकीय अधिक्षक जामखेड यांना दिले आहे.