महाराष्ट्रात आणखीन एका नव्या राजकीय पक्षाची भर, आमदार कपिल पाटलांचा नितिश कुमारांना जोरदार धक्का, केली मोठी घोषणा !

Kapil Patil samajwadi Ganrajya Party : लोकसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. देशभर मोठ्या राजकीय उलथापालथी सुरु आहेत.NDA विरूध्द INDIA आघाडी अशी लढत या निवडणुकीत पहायला मिळणार आहे.दोन्ही आघाड्यांमध्ये जास्तीत जास्त राजकीय पक्ष यावेत यासाठी दोन्ही गट प्रयत्नशील आहेत. तर दुसरीकडे देशात नवीन राजकीय पक्षांचेही जन्म होऊ लागले आहेत. महाराष्ट्रात आता 2 नव्या राजकीय पक्षांची भर पडली आहे. यातील एका पक्षाची घोषणा आज रविवारी करण्यात आली.

Addition of another new political party in Maharashtra, MLA Kapil Patil gave big blow to Nitish Kumar, kapil Patil samajwadi Ganrajya Party,

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या जनता दल युनायटेड (JDU) पक्षाला रविवारी महाराष्ट्रात मोठा धक्का बसला. जेडीयुचे राष्ट्रीय महासचिव कपिल पाटील यांनी नितीशकुमार यांची साथ सोडली. नितीशकुमार यांनी NDA सोबत जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे JDU तील अनेक नेते नाराज असल्याची चर्चा होती. याचे पडसाद महाराष्ट्रात उमटले. महाराष्ट्रातील JDU चे एकमेव आमदार असलेल्या कपिल पाटील यांनी रविवारी नव्या राजकीय पक्षाची घोषणा केली.नितीशकुमार कुमार यांच्या जनता दल युनायटेडची कपिल पाटील यांनी साथ सोडली.

माजी आमदार तथा ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी काही दिवसांपुर्वी ओबीसी बहुजन पार्टी या पक्षाची घोषणा केली होती. आता समाजवादी विचारांचे खंदे समर्थक तथा विधानपरिषदेतील शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी नव्या राजकीय पक्षाची घोषणा केली आहे. समाजवादी गणराज्य पक्ष असे कपिल पाटील यांच्या नव्या पक्षाचे नाव आहे. नव्या वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात  ओबीसी बहुजन पार्टी व समाजवादी गणराज्य पक्ष या दोन नव्या पक्षांची भर पडली आहे.

जनता दल युनायटेडचे राष्ट्रीय महासचिव आमदार कपिल पाटील यांनी जनता दल युनायटेड पक्षातून बाहेर पडत समाजवादी गणराज्य पक्षाची घोषणा केली. विशेष म्हणजे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी नव्या पक्षाची घोषणा केली. ‘समाजवादी ऐक्याचा धम्मघोष… समाजवादी गणराज्याचा संकल्प’ असा नारा देत कपिल पाटील यांनी आपला नवा पक्ष स्थापन केला आहे.

कोण आहेत कपिल पाटील?

कपिल पाटील हे महाराष्ट्राच्या विधानपरिषदेतील एकमेव समाजवादी आमदार आहेत. इतकचं नाही तर ते राष्ट्र सेवा दलाचे कार्यकारी ट्रस्टीदेखील आहेत. समाजवादी नेते बापूसाहेब काळदाते यांच्यानंतर समाजवादी आंदोलनातील एका कार्यकर्त्याला राष्ट्रीय स्तरावर मोठा सन्मान देण्यात आला आहे. कपिल पाटील सलग 3 वेळा महाराष्ट्र विधान परिषदेत मुंबईतील शिक्षकांचे प्रतिनिधित्व करत आहेत.

शिक्षण आणि शिक्षकांच्या अधिकारांसाठी ते विधान परिषदेत नेहमी आवाज उठवताना दिसतात. त्यांचे सर्व पक्षीय नेत्यांसोबत चांगले संबंध आहेत. विशेष म्हणजे ओबीसी आणि मंडल आयोग आंदोलनात त्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली होती. जनता दल युनायटेड या पक्षाचे ते राष्ट्रीय महासचिव म्हणून काम पाहत होते. आता ते समाजवादी गणराज्य पक्षाच्या माध्यमांतून महाराष्ट्राच्या राजकारणात नवी इनिंग खेळण्याच्या तयारीत आहे.