Nanded earthquake today : नांदेड शहर रविवारी सायंकाळी भूकंपाच्या सौम्य धक्क्याने हादरले. नांदेड शहरात रविवारी सायंकाळी सहा वाजून अठरा मिनिटांनी भूकंप झाला. अचानक गूढ आवाज झाला. त्याचबरोबर जमीन हादरली. शहरातील अनेक भागात भूकंपाचे धक्के जाणवले त्यामुळे नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. या भूकंपाची तीव्रता 1.5 रिष्टर स्केल इतकी होती.
नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाच्या भूविज्ञान विभागातील भूकंपमापक यंत्रावर भूकंपाची नोंद झाली आहे. 6 वाजून 18 मिनिटांनी नांदेड शहरात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. शहरात भूकंप झाल्याने नागरिकांमध्ये घाबरट पसरली आहे.
नांदेड शहरातील उत्तर भागातील शिवाजीनगर, महावीर सोसायटी, यशोविहार, आयटीआय परिसर, शासकीय कॉलनी, विवेक नगर, श्रीनगर आदी भागात भूगर्भातून आवाज आला. त्यामुळे काही ठिकाणी नागरिक घराबाहेर आले.तसेच याबाबतची माहिती स्थानिक नागरिकांनी नियंत्रण कक्षाला दिली.
याबाबत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील भूशास्त्र संकुल विभागाचे संचालक प्रा. डॉ. अविनाश कदम आणि प्रा. डॉ. टी. विजयकुमार यांना माहिती विचारण्यात आली.विद्यापीठातील भुकंपमापक यंत्रावर या धक्क्यांची नोंद १.५ रिश्टर स्केल एवढी झाली असल्याचा प्राथमिक अहवाल प्रा. डॉ. टी. विजयकुमार यांनी नियंत्रण कक्षाला कळविला आहे.
या घटनेची जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनीही नोंद घेतली व त्यानुसार माहिती मागवली आहे.विद्यापीठातील भूकंप मापन यंत्रणेच्या प्राथमिक अंदाजानुसार दहा किलोमीटर अंतरावर हा भुकंपाचा धक्क्याची नोंद झाली आहे. नांदेड उत्तर शहरातील शिवाजीनगर, गणेशनगर, विजयनगर, पावडेवाडी नाका, यशोविहार, आयटीआय, शासकीय कॉलनी, विवेकनगर, श्रीनगर परिसरात सायंकाळी सहा वाजून अठरा मिनिटांनी १.५ रिश्टर स्केलचा अतिसौम्य भुकंपाचा धक्का बसला आहे.
विद्यापीठातील भूशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. टी विजयकुमार यांनी यापूर्वी देखील नांदेडमध्ये या भागात २००८ आणि २०१०-११ मध्ये असे भूकंपाचे सौम्य धक्के बसले असल्याची माहिती यावेळी दिली. दरम्यान, नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.