कुलदीप यादव, आर आश्विनची भेदक गोलंदाजी तर रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वालचे अर्धशतक, धर्मशाळा कसोटीच्या पहिल्या दिवशी भारताचे इंग्लंड विरूध्द वर्चस्व !
Ind vs Eng Dharamshala Test : पाच कसोटी मालिकेवर कब्जा मिळवलेला भारतीय संघ पाचवा कसोटी सामना जिंकण्यासाठी आज धर्मशाळा येथील मैदानावर उतरला. पहिल्याच दिवशी भारताने कसोटीवर वर्चस्व मिळवले. भारतीय फिरकी गोलंदाज कुलदीप यादव आणि आर आश्विनने केलेल्या भेदक गोलंदाजीमुळे इंग्लंडचा पहिला डाव अवघ्या 218 धावांवर आटोपला. भारताने रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल यांच्या दमदार अर्धशतकीय खेळीमुळे पहिल्या डावांत एक विकेट्स मोबदल्यात 135 धावा बनवल्या.
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना आज धर्मशाळा येथे खेळवला जात आहे. या सामन्यात डावखुरा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने पहिल्या डावांत पाच विकेट्स आणि ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने 4 विकेट्सच्या घेतल्या.
कर्णधार रोहित शर्मा (83चेंडूत नाबाद 52 धावा, सहा चौकार, दोन षटकार) आणि यशस्वी जैस्वाल (58 चेंडूत 57 धावा, पाच चौकार, तीन षटकार) यांनी अर्धशतकांसह पहिल्या विकेटसाठी 104 धावांची शानदार भागीदारी केली. दिवसाचा खेळ संपला तेव्हा शुभमन गिल 26धावा करत रोहितला साथ देत होता. भारत आता इंग्लंडपेक्षा फक्त 83 धावांनी मागे आहे आणि भारताच्या नऊ विकेट शिल्लक आहेत.
मालिकेतील शेवटच्या सामन्याच्या पहिल्या दिवशी कुलदीप यादवनेही एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. कमी चेंडूत कसोटीत सर्वाधिक 50 बळी घेणारा कुलदीप हा भारतीय गोलंदाज ठरला आहे. हा टप्पा गाठण्यासाठी कुलदीपला केवळ 1871 चेंडू लागले. या यादीत त्याच्या मागे अक्षर पटेल (2205) आणि जसप्रीत बुमराह (2520) आहेत. भारताच्या कसोटी इतिहासात 2000 पेक्षा कमी चेंडू टाकून 50 कसोटी बळी पूर्ण करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
याशिवाय कसोटीत किमान 50 बळी घेत सर्वोत्तम गोलंदाजी स्ट्राइक रेट असलेल्या खेळाडूंच्या यादीत कुलदीप यादव दुसऱ्या क्रमांकावर आहे. कुलदीप यादवचा गोलंदाजीचा स्ट्राईक रेट 36.8 आहे. या यादीत इंग्लंडचा जॉर्ज लोहमन आहे, ज्याचा गोलंदाजीचा स्ट्राइक रेट 34.1 आहे. कुलदीप यादवनंतर जॉन फेरीस, शेन बाँड, डुआन ऑलिव्हियर आणि कागिसो रबाडा यांचा समावेश आहे.
भारतीय फिरकीपटूंच्या खात्यात 10 विकेट
कुलदीप यादवने पाचव्या कसोटीच्या पहिल्या डावांत 72 धावांत पाच विकेट्स घेतल्या. त्याने इंग्लंडच्या वरच्या आणि मधल्या फळीला बाहेर काढले, तर अश्विनने 51 धावांत चार विकेट्स घेतल्या. त्याने तळच्या फलंदाजांना बाद केले. रवींद्र जडेजानेही 17 धावांत एक विकेट घेतली, सर्व 10 विकेट फिरकीपटूंच्या खात्यात गेल्या.
इंग्लंडकडून सलामीवीर जॅक क्रॉलीने (108 चेंडूत 79 धावा, (11 चौकार आणि एक षटकार) सर्वाधिक धावा केल्या. अश्विनप्रमाणेच आपली 100वी कसोटी खेळणाऱ्या जॉनी बेअरस्टो (18 चेंडूत 29 धावा), सलामीवीर बेन डकेट (27), जो रूट (26) आणि बेन फोक्स (24) चांगल्या सुरुवातीचा फायदा उठवू शकले नाहीत.
देवदत्त पड्डिकलचे भारतीय कसोटी संघात पदार्पण
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत भारतीय संघात पाच युवा खेळाडूंना पदार्पणाची संधी मिळाली. रजत पाटीदार वगळल्यास सर्फराज खान, आकाश दीप व ध्रुव जुरेल यांनी प्रभावी कामगिरी केली. देवदत्त पड्डिकलला धरमशाला कसोटीत पदार्पणाची संधी मिळाली आहे.
ये बढेगा आगे… बढेगा…’; ध्रुव जुरेलचं अचूक भाकित अन् भारताला मिळाली मोठी विकेट,
ध्रुव जुरेलने केवळ फलंदाजीतच नव्हे, तर यष्टींमागेही चमकदार कामगिरी करून रिषभ पंतच्या अनुपस्थितीत प्लेइंग इलेव्हनमधील त्याचा दावा मजबूत केला आहे. ध्रुवने आजही यष्टींमागे कमाल केली आणि त्याने केलेलं भाकित खरं ठरलं.कुलदीप यादवच्या गुगलीवर पुढे येऊन फटका मारण्याचा ऑली पोपचा प्रयत्न फसला आणि तो 14 धावांवर यष्टीचीत झाला. पोपची विकेट पडण्यापूर्वी जुरेल म्हणाला होता की हा पुढील चेंडूवर पुढे येऊन फटका मारण्याचा प्रयत्न करेल आणि तसेच झाले आणि ऑली पोप स्वस्तात बाद झाला.