जामखेड : “तोवर आम्ही मागे हटणार नाही – रत्नदीप मेडिकल कॉलेजच्या अंदोलक विद्यार्थ्यांचा निर्धार, डाॅ भास्कर मोरेंविरोधात एकवटलेल्या विद्यार्थ्यांना मिळतोय अनेकांचा पाठिंबा”
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । रत्नदीप मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी कॉलेजच्या संस्थापकाविरोधात घेतलेल्या आक्रमक भूमिकेचे जामखेडमध्ये सलग तिसऱ्या दिवशी तीव्र पडसाद उमटले. विद्यार्थी आपल्या मागण्यांवर कायम असल्याने प्रशासनावर कारवाईसाठी दबाव वाढू लागला आहे. विद्यार्थ्यांच्या या अंदोलनास समाजातील वेगवेगळ्या घटकांचा पाठिंबा वाढला आहे. यामुळे रत्नदीप मेडिकल काॅलेज आणि डाॅ भास्कर मोरे हे सलग तिसऱ्या दिवशी चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. डाॅ मोरे यांच्यावर काय कारवाई होणार याकडे आता जामखेड तालुक्याचे लक्ष लागले आहे.

जामखेडच्या रत्नापुर येथील रत्नदीप मेडिकल काॅलेजमध्ये राज्यभरातील शेकडो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या काॅलेजचे संस्थापक अध्यक्ष डाॅ भास्कर मोरे यांच्या मनमानी कारभाराविरोधात विद्यार्थ्यांमध्ये संतापाची तीव्र लाट उसळली आहे. रत्नदीप संस्थेतील विद्यार्थ्यांनी मंगळवारपासून तीव्र अंदोलन हाती घेतले आहे. सलग तिसऱ्या दिवशी या अंदोलनाचे पडसाद जामखेडमध्ये उमटले. डाॅ भास्कर मोरे यांच्यावर रत्नदीपच्या विद्यार्थ्यांनी विशेषता: मुलींनी गंभीर आरोप केले आहेत.या अंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी रत्नदीपच्या विद्यार्थ्यांनी उपोषण हाती घेतले आहे. त्यांच्या या अंदोलनाला विविध सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांकडून पाठिंबा वाढत आहे.
डाॅ भास्कर मोरे यांच्यावर कारवाई व्हावी या मागणीसाठी तिसऱ्या दिवशी रत्नदीपच्या विद्यार्थ्यांनी निषेध मोर्चा काढला होता. खर्डा चौकातून हा मोर्चा तहसील कार्यालयावर नेण्यात आला. यावेळी डाॅ भास्कर मोरेंविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या घोषणाबाजीमुळे जामखेड शहर दणाणून गेले होते. त्यानंतर विद्यार्थ्यांनी जुन्या पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषणाचे अंदोलन सुरू केले. या अंदोलनास मोठा पाठिंबा मिळत आहे. जोपर्यंत डाॅ मोरे यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही, तोवर अंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार विद्यार्थ्यांनी केला आहे.
दरम्यान, प्रांताधिकारी नितिन पाटील व पोलिस उपअधीक्षक विवेकानंद वाखारे यांनी जामखेडला भेट दिली.जामखेडमध्ये विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या अंदोलनाची त्यांनी दखल घेतली. रत्नदीपच्या विद्यार्थीनींनी केलेल्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी महिला पोलिस अधिकाऱ्याची (सहाय्यक पोलीस निरीक्षक) नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती त्यांनी अंदोलक विद्यार्थ्यांना दिली. रत्नदीप मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी हाती घेतलेल्या या अंदोलनास या निमित्ताने मोठे यश मिळाले आहे.
“मोर्चा संपल्यानंतर विविध सामाजिक संघटना व राजकीय पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या अंदोलनास पाठिंबा दर्शवत आपल्या भावना व्यक्त केल्या. सर्वांनी डाॅ भास्कर मोरे यांच्या विरोधात कारवाईची मागणी केली.जोवर कुलगुरू जामखेडला येत नाहीत आणि डाॅ भास्कर मोरे यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोवर आम्ही मागे हटणार नाही. आमचे अंदोलन सुरूच राहिल असा आक्रमक पवित्रा अंदोलक विद्यार्थ्यांनी घेतला आहे.”
दरम्यान, अंदोलकांच्या भावना समजून घेतल्यानंतर जामखेडचे तहसीलदार गणेश माळी म्हणाले की,आपण दिलेल्या सर्व मुद्द्यांवर चर्चा होऊन वरिष्ठांना अहवाल पाठवला आहे. विद्यार्थ्यांना डाॅ भास्कर मोरे यांनी विनाकारण जे बंधन घातले आहे, त्याबाबत आम्ही डाॅ भास्कर मोरे यांना समज दिली आहे. त्याबरोबर आपल्या मागण्यांचे निवेदन कुलगुरू यांना पाठवण्यात आल्याचे ते म्हणाले.
यावेळी भाजपचे शहराध्यक्ष पवनराजे राळेभात, मनसेचे तालुकाध्यक्ष प्रदिप टापरे,पांडुराजे भोसले, रमेश (दादा) आजबे, सुनील साळवे, हवा सरनोबत, सनी सदाफुले, आण्णासाहेब सावंत, शप्रहारचे जयसिंग उगले, महेश निमोणकर, गणेश हगवणे, सचिन देशमुख,अवधूत पवार, नाना खंडागळे, आकाश घागरे, भाऊ पोटफोडे, जगन्नाथ म्हेजे, गणेश मासाळ, गणेश जोशी, स्वप्निल खाडे, विजय राळेभात, विकास मासाळ, बाळासाहेब ढाळे, रोहित चव्हाण, आम आदमीचे संतोष नवलाखा, अनिल पाटील यांच्या सह रत्नदीप मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी व विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
जामखेड तालुका वकिल संघाचा विद्यार्थ्यांच्या अंदोलनास पाठिंबा
रत्नदीप मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी हाती घेतलेल्या उपोषणाच्या अंदोलनास जामखेड तालुका वकिल संघाने पाठिंबा दिला आहे. रत्नदीप मेडिकल कॉलेजमधील मुली सुरक्षित नसल्याचे सध्या सुरू असलेल्या अंदोलनावरून स्पष्ट होत असून रत्नदीप मेडिकल कॉलेजमध्ये सुरू असलेल्या गैरप्रकाराची तहसीलदार व पोलिस निरीक्षक यांनी तातडीने राज्य महिला आयोगाकडे तक्रार करावी. सदर प्रकरणाची महिला आयोगाकडून सखोल चौकशी करावी, अशी मागणी जामखेड तालुका वकिल संघाने केली. यावेळी अध्यक्ष ॲड शमा हाजी कादर, उपाध्यक्ष ॲड. नितीन घुमरे, सचिव ॲड कृष्णा शिरोळे, ॲड. संग्राम पोले, ॲड महारुद्र नागरगोजे, ॲड पोपट कात्रजकर, ॲड जैद सय्यद, ॲड. बाळासाहेब घोडेस्वार, ॲड सुमित बोरा, ॲड. मोहन कारंडे, ॲड. प्रदीप बोलभट, ॲड. प्रविण ससाणे, ॲड. नितीन राजपूरे, ॲड. अजिनाथ जायभाय आदी उपस्थित होते.

दरम्यान उपोषणकर्त्यां तीन मूलींना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असून अनेक मूलं मूलींना अशक्तपणा आला आहे.रत्नदीप मेडिकल कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष डॉ भास्कर मोरे यांच्याकडून होत असलेल्या अन्याय व छळवणूकीच्या त्रासाला कंटाळुन रत्नदिपच्या विद्यार्थ्यांनी तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. आज चौथ्या दिवशी काही मुलींची प्रकृती खराब झाली. अशक्तपणा आला आहे. त्यामुळे 3 मुलींना उपचारासाठी जामखेड ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
